Bookstruck

जातककथासंग्रह भाग २ रा 5

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »
१०८. मूर्खाला उपदेश केल्याचें फळ.

(कुटिदूसक जातक नं. ३२१)


हिमालयावर एकदां एक माकड पावसांत भिजून थंडीनें कुडकुडत एका झाडाखालीं बसला होता. त्या वृक्षावर घरटें बांधून रहाणारा पक्षी त्याला म्हणाला, ''मनुष्यासारखे तुझे हातपाय आहेत आणि डोकेंही मनुष्यासारखें दिसतें आहे. तर मग चांगलें घरटें न बांधता तूं पावसांत कुडकुडत कां बसलास ?''

त्यावर वानर म्हणाला, ''मनुष्यासारखे हातपाय वगैरे माझे अवयव आहेत खरे. परंतु मनुष्याजवळ जी एक बुद्धि नांवाची वस्तु आहे, ती मजपाशीं नाहीं.''

तो पक्षी म्हणाला, ''ज्याच्या चित्ताला स्थिरता नाहीं आणि दुसर्‍याचा द्रोह करण्यांत ज्याचा काळ जातो व ज्याच्या अंगीं सद्गुण वास करीत नाहींत त्याला सुख कसें प्राप्‍त होईल ? म्हणून असला दुष्ट स्वभाव सोडून देऊन सद्गुणांचें संपादन कर, आणि तुझ्या अंगीं शीतोष्णापासून निवारण करण्यासाठीं कुटी बांधण्यांचें सामर्थ्य येईल.''

माकडाला पक्ष्याच्या उपदेशाचा फार राग आला आणि तो म्हणाला, ''घरट्यांत बसून मोठ्या उपदेशाच्या गोष्टी सांगतोस काय ? याबद्दल तुला मी योग्य प्रायश्चित्त देतों. माकड असें बोलून झाडावर चढला, आणि त्यानें पक्ष्याचें घरटें मोडून टाकलें ! दुष्टाला उपदेश केल्याचा हा परिणाम आहे, असें म्हणत पक्षी तेथून उडून गेला.
« PreviousChapter ListNext »