Bookstruck

जातककथासंग्रह भाग २ रा 15

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »
११६. शत्रु लहान म्हणून त्याचें कौतुक करूं नये

(पलासजातक नं. ३७०)


आमचा बोधिसत्त्व एका जन्मीं सुवर्णहंस होऊन हिमालयावर रहात असे. तो ज्यावेळीं चरावयास जात असे त्यावेळीं वाटेंत एका पलाश वृक्षाखाली विश्रांतीसाठीं बसत असे. रोजच्या संवयीमुळें त्या पळसाच्या झाडावर त्याचें फार प्रेम बसलें. एके दिवशीं एका पक्ष्यानें वडाचीं फळें खाऊन त्या पळसाच्या झाडाच्या दोन फांद्यांमध्यें देहधर्म केला. पावसाळ्यांत त्या ठिकाणीं वडाचा रोप रुजून आला. त्याचीं तीं कोमल पानें पाहून पलाशदेवता मोठें कौतुक करूं लागली. हंस जेव्हां त्या ठिकाणीं विश्रांतीसाठीं आला तेव्हां त्यालादेखील तिनें या वडाच्या नवीन रोपाचें मोठें कौतुक सांगितलें. तेव्हां हंस पलाशदेवतेला म्हणाला, ''बाई ग, याचें तूं कौतूक करूं नकोस. तूं या ठिकाणींच स्थिर असल्यामुळे वडाचें झाड कसें असतें याची तुला कल्पना नाहीं. याला जर वाढूं दिलेंस तर हा वृक्ष तुझें समूळ निर्मूलन करून टाकील, व मग तुला आपल्या प्रेमाचा भयंकर पश्चात्ताप करावा लागेल.''

पलाशदेवता म्हणाली, ''तें कांहीं असो. सध्यां तरी मला याजपासून कांहींच त्रास होत नाहीं. बिचार्‍यानें माझा आश्रय केला असल्यामुळें त्याच्यावर माझें मातृवत् प्रेम जडलें आहे. तेव्हां त्याचें उच्चाटण मी कसें करावें ?''

हंस म्हणाला, ''मला जें काय वाटलें तें मी तुला सांगितलें आहे. यावर तुझी मर्जी. तथापि आणखी एकवार सांगतों कीं, या रोपाची वृद्धि तुझ्या नाशाला कारण होईल.''

असें बोलून हंस पलाशाची मैत्री सोडून दुसरीकडे चालता झाला.

इकडे हळूहळू वडाचा रोप वाढत गेला, व त्याने त्या पलाशाच्या झाडाला म्हणजे पलाशदेवतेच्या निवासस्थानाला पूर्णपणें ग्रासून टाकलें ! तेव्हां पलाशदेवता म्हणाली, ''हंस जें सांगत होता तें खोटें नाहीं. जो वृद्धि पावत असतां आपल्या आश्रयदात्यांचाच नाश करून टाकतो, त्याला आश्रय देणें आणि त्यावर प्रेम करणें सर्वथैव अनिष्ट होय.''
« PreviousChapter ListNext »