Bookstruck

जातककथासंग्रह भाग २ रा 22

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »
१२०. सर्वांची सारखी संभावना करणारा पर्वत.

(नेरुजातक नं. ३७९)

आमचा बोधिसत्त्व एकदां हंस होऊन आपल्या धाकट्या भावासह दूरदूरच्या प्रदेशांत चारा शोधण्यासाठीं जात असे. ते दोघे एके समयीं मेरुपर्वतावर गेले. त्या पर्वताचा असा गुण असे कीं, त्याच्यावर वास करणार्‍या सर्व प्राण्यांची कांति सुवर्णाची होत असे. बोधिसत्त्व आणि त्याचा भाऊ तेथें गेल्याबरोबर त्यांचीहि अंगकांति सोन्याची दिसूं लागली. दुसरे प्राणीहि सोन्याचेच दिसत होते. तें पाहून धाकटा भाऊ बोधिसत्त्वाला म्हणाला, ''दादा, हें काय आश्चर्य आहे ? येथें सर्वच प्राणी सोन्याचे दिसत आहेत ! बोधिसत्त्व म्हणाला, ''बाबारे, या पर्वताची ही थोरवी आहे. जो कोणी याचा आश्रय करतो त्याची कांति तो येथें असेपर्यंत सोन्याची होत असते.''

''पण दादा, असला हा सर्वांना सारख्या रीतीनें वागविणारा पर्वत मला मुळींच आवडत नाहीं. कावळे कोल्हे इत्यादि नीच प्राणी आणि सिंहव्याघ्रदिक समर्थ प्राणी यांचा जेथें सारखाच मान राखला जातो, त्या स्थळाचा आश्रय करणें मला योग्य वाटत नाहीं. म्हणून आपण येथून निघून जाऊं.''

बोधिसत्त्व म्हणाला, ''तूं म्हणतोस ही गोष्ट खरी आहे. ज्या दरबारांत हुजर्‍याचा आणि पंडिताचा सारखाच मान असतो त्या दरबारचा शहाण्यानें आश्रय करूं नये असें सुभाषित आहेच. तेव्हां हा जरी सर्व पर्वतांचा राजा आहे, आणि ह्याची योग्यता मोठी आहे तथापि सर्व प्राण्यांना सोन्याचें बनवणें हा कांहीं याचा गुण म्हणतां येत नाहीं.''

असें बोलून बोधिसत्त्व आपल्या भावासह तेथून उडून गेला.
« PreviousChapter ListNext »