Bookstruck

जातककथासंग्रह भाग २ रा 25

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »
१२२. विद्वानेव प्रजानाति विद्वज्जनपरिश्रमम्.

(सूचिजातक नं. ३८७)

आमचा बोधिसत्त्व एकदां लोहाराच्या कुळांत जन्मला होता. तरुणपणीं आपल्या कलेंत तो अत्यंत दक्ष झाला. परंतु खेडेगावीं राहून ओबडधोबड आउतें तयार करून पोटभरणें त्याला आवडेना. काशिराष्ट्रांत प्रसिद्ध लोहारांचा एक गांव असे. त्या गांवीं सर्व तर्‍हेचीं उत्तम शस्त्रास्त्रें बनत असत, व तेथूनच तीं काशीच्या आसपासच्या राष्ट्रांत पाठविण्यांत येत असत. बोधिसत्त्वानें एक उत्तम सुई तयार केली; व त्या गांवीं जाऊन 'कोणाला सुई पाहिजे आहे काय' असें बोलत तो रस्त्यांतून फिरूं लागला. परंतु त्याला कोणींच बोलावलें नाहीं. तरी पण आपल्या सुईचें नानाप्रकारें वर्णन करित तो तसाच पुढें चालला. तेथल्या लोहारांच्या मुख्याच्या घरावरून चालला असतां त्याची मुलगी बाहेर जाऊन बोधिसत्त्वाला म्हणाली, ''बाबारे ! हा तूं काय वेडेपणा चालविला आहेस ? सुया, गळ वगैरे सर्व लोखंडी सामान येथेंच तयार होऊन गावोंगावीं जात असतें. या लोहारांच्या गांवीं कोण घेणार बरें ?''

बोधिसत्त्व म्हणाला, ''बाई गं, आपल्या शिल्पाचें ज्याला प्रदर्शन करावयाचें असेल त्यानें तें योग्य ठिकाणींच केलें पाहिजे. सुईची पारख लोहारांच्या गावींच व्हावयाची, आणि येथील मुख्य लोहारानें जर ही माझी सुई पाहिली तर तो माझा योग्य गौरव केल्यावांचून रहाणार नाहीं.''

हें बोधिसत्त्वाचें भाषण ऐकून ती तरुण मुलगी आपल्या बापाच्या कारखान्यांत धांवत गेली, आणि तिनें त्याला ही हकीगत सांगितली. तेव्हां मुख्य लोहारानें बोधिसत्त्वाला कारखान्यांत बोलावून नेलें. तेथें त्यानें आपली सुई सर्व लोहारांना दाखविली. ती पाहून बोधिसत्त्वाच्या शिल्पाचें सर्वांना अत्यंत आश्चर्य वाटलें. मुख्य लोहारानें आपली एकुलती एक मुलगी बोधिसत्त्वाला देऊन त्याला आपला घरजावई केलें; व वृद्धापकाळ संनिध आल्यावर आपली मुख्य लोहाराची जागा त्यालाच देऊन टाकिली. बोधिसत्त्वानें त्या गांवच्या लोहारकामाची कीर्ति द्विगुणित केली.

तात्पर्य विद्वानाच्याच गांवीं विद्वत्तेचें चीज होतें.
« PreviousChapter ListNext »