Bookstruck

जातककथासंग्रह भाग २ रा 27

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »
खेंकडा म्हणाला, ''माझ्या मित्राच्या नाशाला तुम्ही दोघेही कारण आहांत असें मला वाटतें. म्हणून मी तुम्हांला पकडलें आहे.''

साप म्हणाला, ''पण हा मनुष्य मेला तर त्यांत तुझें काय गेलें ?''

खेंकडा म्हणाला, ''यानें माझ्यावर पुष्कळ उपकार केलें आहेत. एवढेंच नव्हे तर आज तो मला घेऊन पाण्यांत सोडण्यासाठीं जात होता. जर मी याचे प्राण वांचविले नाहींत तर माझीहि धडगत दिसत नाहीं. कांकीं, मी माझ्या मंद गतीनें पाणी गांठीपर्यंत कोणी तरी पकडून मला पचनी पाडील. तेव्हां मित्राला साहाय्य करणें यांतच कर्तव्य आणि स्वार्थ आहे.''

तें ऐकून सर्प त्याला म्हणाला, ''असें जर आहे, तर आम्हां दोघांना सोडून दे. मी याच्या शरीरांत भिनत चाललेलें विष पुनरपि आकर्षून घेतों. त्वरा कर ! जर आणखी कांहीं वेळ जाऊ दिला, तर विष ओढून घेणें अशक्य होईल.''

खेंकड्यानें सापाला सोडून दिलें; आणि तो म्हणाला, ''माझ्या मित्राला पूर्वीप्रमाणें निरोगी पाहिल्याशिवाय मी या कावळ्याला सोडावयाचा नाहीं. तूं याचें विष समूळ ओढून घेऊन याला बरा कर, आणि मग मी तुझ्या मित्राला मुक्त करितों. कावळ्यावर आणि सर्पावर विश्वासण्याएवढा मी मूर्ख नाहीं हें पक्कें लक्षांत ठेव.''

तेव्हां निरुपायानें सापानें बोधिसत्त्वाच्या अंगांतील विष आकर्षून घेतलें, व त्याला पूर्वीप्रमाणें निरोगी केलें; आणि तो तेथून पळत सुटला. इकडे खेंकड्यानें कावळाच या सर्व कटाचें मूळ असें जाणून त्याची मान कापून खालीं पाडली. तें पाहून कावळ्याच्या बायकानें तेथून पलायन केलें. सापानें तर तो प्रांत देखील वर्ज्य केला. बोधिसत्त्वानें खेंकड्याला नेऊन त्याच्या इच्छेप्रमाणें नदींत सोडलें.
« PreviousChapter ListNext »