Bookstruck

जातककथासंग्रह भाग २ रा 32

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »
१२७. बलिष्ठाचा न्याय.

(दीपिजातक नं. ४२६)

एका अरण्यांत एक वाघ रहात असे. एके दिवशीं शिकारीस निघाला असतां वाटेंत त्याला एक बकरी आढळली. तिला पाहून ही चांगली शिकार आहे असें वाटून तो तेथेंच दबून बसला. वाघावर नजर पडल्याबरोबर बकरीची पांचावर धारण बसली. पण लाडिगोडीनें कसें तरी याच्या हातून निसटून जावें असा विचार करून दुरूनच ती त्याला म्हणाली, ''वाघमामा, आपली तब्येत कशी काय आहे ? माझ्या आईनेंहि आपला समाचार विचारला आहे.''

ही लबाड बकरी मामा मामा म्हणून मला ठकवावयास पहात आहे असें जाणून वाघ तिला म्हणाला, ''हा दुष्ट बकरे ! माझ्या शेपटीवर पाय देऊन मामा मामा म्हणून मला ठकवूं पहात आहेस काय ? माझ्या शेपटीवर पाय दिलेल्या प्राण्याला मी जिवंत सोडीन असें तुला कसें वाटलें ?''

बकरी म्हणाली, ''तूं माझ्यासमोर बसला असून मी थेट तुझ्या समोरून आलें. असें असतां तुझ्या शेपटीवर पाय दिला, हें कसें संभवेल ?''

त्यावर वाघ मोठ्या डौलानें म्हणाला, ''हें तुला काय ठाऊक आहे ? माझें शेपूट सर्व पृथ्वीवर पसरलें आहे, आणि तें तुडविल्यावांचून एक पाऊल देखील टाकणें तुला कसें शक्य होईल ?''

या दुष्टाला गोड बोलून वळविण्यांत अर्थ नाहीं असें जाणून बकरी म्हणाली, ''ही गोष्ट खरी आहे. मी माझ्या आईबापांकडून असें ऐकत होतें कीं, खलाचें शेपूट फार लांब असतें आणि म्हणूनच तें न दुखवण्यासाठीं आकाशमार्गानें येथें आलें.''

त्यावर वाघ गुरगुरून म्हणाला, ''तूं जेव्हां आकाशांतून उडत चाललीस तेव्हां तुला पाहून सगळे मृग इतस्ततः पळून गेले, आणि त्यामुळें मला आज उपाशी रहाण्याची पाळी आली आहे ! आतां तुला मारून खाल्ल्यांवाचून मला दुसरा मार्गच राहिला नाहीं !''

हे शब्द ऐकून बिचार्‍या बगरीची बोबडीच वळली ! वाघानें तिला तात्काळ मारून खाल्लें. मृदु वचनानें दुष्टाला वळवूं पहाणें ही मोठी चूक होय. कांकीं, त्याचा न्याय कांहीं निराळाच असतो.
« PreviousChapter ListNext »