Bookstruck

जातककथासंग्रह भाग ३ रा 12

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »
एके दिवशीं वासुदेववंशातील सर्वजण समुद्रस्नानासाठीं तेथें गेले असतां त्यांच्यांत कलह उत्पन्न झाला. जवळपास शस्त्र नसल्यामुळें एकानें त्यांतील एरक गवताचा टाक उपटला. तो त्याच्या हाती येतांच मोठ्या गदेचें स्वरूप पावला. याप्रमाणें ज्यानें त्यानें त्या एरक गवताच्या सहाय्यानें रणकंदन माजविलें. याचा परिणाम असा झाला कीं, वासुदेव, बलदेव, अंजनादेवी आणि त्यांचा पुरोहित एवढे चौघेच काय ते पळ काढल्यामुळें बचावले. बाकी सर्वांचा संहार झाला.

वासुदेवादिक कालमत्तीय अरण्यांत पोंहोंचले. तेथें मुष्टिक यक्षानें त्यांस पाहून मल्लयुद्ध करण्याच्या मिषानें तो त्यांच्या अंगावर धावून आला. या वेळीं बलदेवाच्या अंगांत मूळची शक्ति नव्हती. तथापि तो मुष्टिक यक्षाशी मल्लयुद्ध करण्यास सज्ज झाला. मुष्टिक यक्षानें त्याला कोवळ्या मुळ्याप्रमाणें क्षणार्धांत खाऊन टाकलें.

वासुदेव पुरोहिताला आणि अंजनादेवीला बरोबर घेऊन तसाच पुढें निघाला. सर्व रात्र चालल्यामुळें तो अतीशय थकून गेला होता. सकाळच्या प्रहरीं एका झुडपाच्या खालीं विश्रांतीसाठीं पडून राहून त्यानें अंजनादेवीला आणि पुरोहिताला भोजनसामग्री मिळविण्यासाठीं गावांत पाठविलें.

इकडे एका व्याधानें त्या झुडपाच्या आड कांहीं पदार्थ हालत आहे व तो रानडुकर असावा अशा शंकेनें वासुदेवावर बाण सोडला. वासुदेव उठून पहातो तों त्या बाणानें पायांवर भयंकर जखम केलेली त्याला दिसून आली. व्याध आपण एका मनुष्याचा अपराध केला असें पाहून भयचकित झाला व पळण्याच्या मार्गास लागला. पण वासुदेवानें त्यास जवळ बोलावून तूं कोण आहेस असा प्रश्न केला.

तो म्हणाला, ''महाराज, मी जरा नांवाचा व्याध आहे. जरा नांवाच्या व्याधानें विद्ध केला असतां तूं मरण पावशील असें भविष्य वर्तविण्यांत आले होतें.''

त्याचें स्मरण झाल्यामुळें वासुदेवाला जगण्याची आशा राहिली नाहीं. तथापि त्यानें व्याधाची विनवणी करून आपली जखम बांधवून घेतली व व्याधाला तेथून पाठवून दिलें. इतक्यांत अंजनादेवी आणि पुरोहित हीं दोघें तेथें आलीं. वासुदेवानें आपली जगण्याची आशा राहिली नाही असें सांगून व त्यांना उपजीविकेकरितां एक मंत्र देऊन तेथेंच प्राण सोडला. याप्रमाणें अंजनादेवीशिवाय वासुदेववंशांत कोणीएक शिल्लक राहिला नाहीं.
« PreviousChapter ListNext »