Bookstruck

जातककथासंग्रह भाग ३ रा 29

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »
पोपटानें केलेल्या स्वागतानें राजा फारच संतुष्ट झाला आणि सारथ्याकडे वळून म्हणाला, ''काय आश्चर्य आहे पहा ! हा पोपट कितीतरी सभ्य आहे ! किती धार्मिक आहे ! आणि किती गोड बोलतो आहे ! पण त्याच्याच जातीचा हा दुसरा राघु पहा. मारा, हाणा, बांधा, ठार करा असें ओरडत आमच्या मागें लागला आहे.''

बोधिसत्त्व म्हणाला, ''महाराज, आम्ही दोघे एकाच आईच्या उदरांत एकाच काळीं जन्मलेले भाऊ आहोंत. आमच्या बालपणीं आम्ही या जवळच्या पर्वतावर घरट्यांत रहात असतां भयंकर तुफान होऊन घरटें खालीं पडलें. आम्ही दोघे उडण्याचा प्रयत्‍न करीत असतां मी या बाजूला व तो त्या बाजूला जाऊन पडला. चोरांनीं त्याला सत्तीगुंभ असें नाव देऊन आपल्या झोंपड्यांत पाळलें. पुष्पक असें नाव ठेवून येथील ॠषींनीं माझा सांभाळ केला.

यावरून आपल्या लक्षांत येईल कीं, माझ्या भावाचा कांहीं अपराध नाहीं. किंवा माझा स्वतःचाहि हा विशेष गुण आहे असें नाहीं. केवळ सहवासाचें हें फळ होय.

चोरांच्या पर्णकुटिकेंतून मारामारी, खून, बांधणें, ठकविणें, लुटालूट इत्यादि गोष्टीच त्याच्या कानीं येत असल्यामुळें त्याच तो शिकत आहे. आणि इकडे सत्य, धार्मिकपणा, अहिंसा, संयम, दम, अतिथीचा सत्कार इत्यादि गोष्टी मी ऐकत आहें आणि पहात आहें. व अशा लोकांच्या सहवासांत मी वाढलेला आहे आणि म्हणून अशाच गोष्टी शिकत आहे.

महाराज, या गोष्टीपासून तुम्हीही बोध घेतला पाहिजे. तो असा कीं, संगतीनें मनुष्य बरा किंवा वाईट होत असतो. कुजलेले मासे दर्भांत गुंडाळले तर दर्भालाहि घाण येत असते. तींच सुवासिक फलें पळसाच्या पानांत गुंडाळलीं तर पळसालाहि चांगला वास येतो. म्हणून तुमच्यासारख्या थोर पुरुषांनीं खलांचा संसर्ग होऊं न देतां सदोदित सज्जनांच्या संगतींत काल कंठावा.''

हा संवाद चालला असतांना आश्रमांतील ॠषि कंदमूलादिक आपल्या चरितार्थाचे पदार्थ गोळा करून तेथें आले. राजानें मोठ्या आग्रहानें त्यांना आपल्या राजधानीला नेलें व तेथें एका रम्य उद्यानांत आश्रम बांधून त्यांची सर्वप्रकारें बरदास्त ठेविली. असें सांगतात कीं, या ॠषींच्या सहवासामुळें राजाच्या कुलांत सात पिढ्यापर्यंत सत्पुरुष जन्माला आले व त्यांनीं आपल्या प्रजेचें पुष्कळ कल्याण केलें.
« PreviousChapter ListNext »