Bookstruck

जातककथासंग्रह भाग ३ रा 33

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »
तें ऐकून राजा म्हणाला, ''हे ॠद्धिमान ब्राह्मण, असला हा भयंकर पदार्थ कोण विकत घेईल बरें. या तुझ्या पदार्थानें माझाच नाश होईल असें नाहीं तर माझ्या सर्व राष्ट्राचा देखील नाश होईल यांत शंका नाहीं. पण या तुझ्या पदार्थाचें नांव तरी काय ?'' इंद्र म्हणाला ''महाराज, तुझ्या राज्यांत आलोल्या दोन नवीन माणसांनीं शोधून काढलेला हा पदार्थ आहे. त्यांच्याच नावावरून याला सुरा किंवा वारुणी म्हणतात. तुम्ही सर्व प्रकारें मदत देऊन याच पदार्थांची पैदास करूं पहात आलां. व तेणें करून तुमच्या राष्ट्राला अधोगतीला नेऊं पहातां. आजपर्यंत सगळ्या जंबुद्वीपांत तुम्ही परम धार्मिक राजे आहां अशी ख्याती आहे. परंतु या सुरेचा प्याला ओठाला लागल्याबरोबर तुमची धार्मिकता तात्काळ नष्ट होणार आहे आणि म्हणूनच मी देवांचा राजा इंद्र ब्राह्मणवेषानें तुम्हांला या सुरादेवीपासून निवृत्त करण्यासाठीं येथें आलों आहे.'' एवढें बोलून इंद्र तेथेंच अंतर्धान पावला.

सुरेचे अनेक दोष ऐकून राजा संविग्न झाला आणि आपल्या आमात्यास म्हणाला, ''देवराजानें आम्हांस मोठ्याच संकटांतून बचावलें. आम्ही व्यसनाधीन झालों असतों तर सर्व राष्ट्रावर मोठाच प्रसंग ओढवला असता. पन्नास बाहेरचे शत्रू आपणावर चाल करून आलेले बरे परंतु व्यसनरूपी एक अंतर्गत शत्रू नको आहे. कां कीं, बाह्य शत्रू जें नुकसान करूं शकणार नाहींत तें हा एकटा करील.

आतां वरुणाला व सुराला आमच्या राज्यांतून घालवून देणें म्हणजे दुसर्‍या राज्यावर अकारण संकट आणणें होय. हे दोघे आजूबाजूच्या राष्ट्रांत शिरून तेथील राजाला वश करून घेतील व तेथें आपला धंदा सुरू करतील तेव्हां त्यांना पकडून याचक्षणीं त्यांचा शिरच्छेद करा. इन्द्राच्या आगमनाचा त्यास सुगावा लागला तर ते पळ काढतील.''

पण लोकांच्या सुदैवानें आणि स्वतःच्या दुर्दैवानें वरुण व सुर आत्मकृत पदार्थाचें सेवन करून स्वस्थ पडले होते. राजसेवकांनीं त्याना तशा स्थितींत पकडून ठार केलें व दारू गाळण्यासाठीं आणलेले पदार्थ पुनः राजाच्या कोठारांत पोचते केले.

« PreviousChapter ListNext »