Bookstruck

जातककथासंग्रह भाग ३ रा 41

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »
शेतकरी म्हणाला ''जिकडे तिकडे अंदाधुंदी चालली असल्यामुळें आम्हाला वेळेवर अन्न मिळेनासें झालें आहे. माझी बायको इतका वेळ आली नाहीं या विवेचनेनें मी तिला सामोरा गेलों. इतक्यांत बैलाच्या पायाला फाळ लागून जखम झाली. जर आमच्या गावाला अधिकार्‍यांनीं आणि चोरांनीं पीडिलें नसतें तर आमचीं कामें वेळच्या वेळीं होऊन अपघात होण्याला जागाच राहिली नसती. आतां तुम्हीच सांगा कीं आमच्या राजाला शाप देतों तें योग्य आहेत कीं नाहींत.'' तें ऐकून पुरोहित ब्राह्मण निरुत्तर झाला आणि तो व राजा तेथून दुसर्‍या गांवीं गेले.

तेथें सकाळीं लौकर उठून गावांतल्या लोकांची स्थिती अवलोकन करीत फिरत असतां एक मनुष्य गाईचें दूध काढीत असलेला त्यांच्या पहाण्यांत आला. गाय जरा खोडसाळ होती. तिनें लाथ मारून दुधांचें भांडें पालथें पाडलें. तेव्हां तो मनुष्य म्हणाला ''अशा रीतीनें आमचा पांचाळ राजा लढाईंत कधीं पालथा पडेल ?'' तें ऐकून पुरोहित म्हणाला ''बाबारे गाईनें तुझ्यावर लाथ झाडली. दुधाचें भांडें पालथें केलें. त्यांत राजाचा अपराध काय ?'' तो म्हणाला ''भो ब्राह्मणा, खात्रीनें यांत पांचाळ राजाचाच अपराध आहे. रात्रीं चोरांनीं आणि दिवसा अधिकार्‍यांनीं उपद्रव दिल्यामुळें आम्हाला पोट भरण्याची देखील मारामार पडूं लागली असे. असे असतां गाय व्याली कीं अमुकच दुभतें अधिकार्‍याकडे पाठविल्यावाचून आमची धडगत नाहीं. पूर्वीच्या काळीं खोडसाळ गाईला आम्ही हात देखील लावित नव्हतों. पण आतां अधिकार्‍याची भर भरण्यासाठीं वासराला उपाशी मारून देखील गाईचें दूध काढून घेणें आम्हास भाग पडतें. मग खोडसाळ गाईना सक्तीनें दुभावें लागतें यांत आश्चर्य तें कसलें ? पांचाळराजाचा अधिकार्‍यावर नीट दाब असता तर आम्हाला ही विपत्ती भोगण्याचा प्रसंग आला असता काय ? आतां तुम्हीच सांगा कीं, या भांड्याचा आणि पांचाळ राजाचा संबंध लागतो कीं नाहीं ?''

राजाला आणि पुरोहिताला त्याचें म्हणणें बरोबर पटलें व ते तेथून दुसरीकडे गेले. तेथें राजाच्या शिपायांनीं एका गाईचें वासरूं मारून त्याचें चामडें काढून घेतलें होतें व ती गाय गवत खाल्ल्यावाचून आणि प्याल्यावाचून हंबरडे फोडित इकडून तिकडे धावत पळत होती. तिची ती अवस्था पाहून गुराखी पोरें राजाला शिव्या आसडून म्हणाले ''आमच्या या गाईप्रमाणेंच राजा पुत्रशोकानें संतप्‍त होवो.'' तें ऐकून पुरोहित म्हणाला ''मूर्ख बेट्यानो, गाय हंबरडे फोडित वासरासाठीं ओरडत असली, तर त्याला राजानें काय करावें ?'' ते म्हणाले ''ब्राह्मण महाराज हा सर्व आमच्या राजाचाच अपराध आहे. त्याचे अधिकारी इतके उन्मत्त झाले आहेत कीं त्यांनीं आजच सकाळीं या गाईच्या वासराला ठार केलें पण त्यांना शिव्या देण्यापेक्षा राजालाच शिव्या देणें योग्य आहे. कां कीं, तो जर धार्मिक असता तर त्याचे कामगार लोक असे उच्छृंखल का झाले असते ?''
« PreviousChapter ListNext »