Bookstruck

संघ भाग १ला 6

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »
उ०:- होय महाराज.

भि०:- मार्गांत वगैरे पडलेल्या चिंध्या गोळा करून केलेल्या चीवरांवर अवलंबून राहण्यासाठीं तुझा हा संन्यास; ह्मणून यावज्जीव तशा चीवरांवर अवलंबून राहण्याचा तूं प्रयत्न केला पाहिजे. क्षौमादि वस्त्रांची चीवरें (कोणीगृहस्थाकडून) मिळालीं, तर तो विशेष लाभ असें तूं समजावें.

उ०:- होय महाराज.

भि०:- तरूतलवासावर अवलंबून राहण्यासाठीं हा तुझा संन्यास; ह्मणुन यावज्जीव झाडाखालीं राहण्याचा तूं प्रयत्न केला पाहिजे. विहारादिक (राहण्यासाठीं) मिळाले तर तो विशेष लाभ, असें तूं समजावें.

उ०:- होय महाराज.

भि०:- गोमूत्राच्या औषधावर अवलंबून राहण्यासाठीं हा तुझा संन्यास. ह्मणून यावज्जीव गोमूत्राच्या औषधावर निर्वाह करण्याचा तूं प्रयत्न केला पाहिजे. घृतनवनीतादिक (औषधोपयोगी पदार्थ) मिळाले तर तो विशेष लाभ असें तूं समजावें.

उ०:- होय महाराज.

तदनंतर चार अकार्य गोष्टी सांगण्यांत येतात.

भि०:- संघांत प्रवेश केलेल्या भिक्षूनें मैथुन व्यवहार करितां कामा नये........... जो भिक्षु मैथुनव्यवहार करील, तो अश्रमण होईल, अशाक्यपुत्रीय होईल. जसा डोकें कापलेला मनुष्य नुसत्या धडानें जगूं शकत नाहीं, तसा मैथुनव्यवहार केला असतां भिक्षु अश्रमण होतो, अशाक्यपुत्रीय होतो; ह्मणून ही गोष्ट तूं यावज्जीव करितां कामा नये.

उ०:- होय महाराज.

भि०:- संघांत प्रवेश केलेल्या भिक्षूनें चोरी करितां कामा नये. गवताची काडी सुद्धा त्यानें दिल्यावांचून घेतां कामा नये. जो भिक्षु ..........  चोरी करील, तो अश्रमण होईल, अशाक्यपुत्रीय होईल,.........ह्मणून यावज्जीन ही गोष्ट तूं करितां कामा नयें.

उ०:- होय महाराज.

भि०: संघांत प्रवेश केलेल्या भिक्षुनें जाणूनबुजून प्राणघात करितां कामा नये. त्यानें किडा मुंगी देखील मारतां कामा नये. जो भिक्षु जाणूनबुजून-गर्भावस्थेंतील देखील-मनुष्यप्राण्याला ठार मारील, तो अश्रमण होईल, अशाक्यपुत्रीय होईल...... ह्मणून यावज्जीव ही गोष्ट तूं करतां कामा नये.

उ०:- होय महाराज.

भि०:- संघांत प्रवेश केलेल्या भिक्षूनें आपणास ध्यानसमाधि प्राप्त झाल्याच्या वल्गना करितां कामा नये. एकांतांतच राहण्यांत मला आनंद वाटतो, अशी प्रौढी देखील त्यानें सांगतां कामा नये. जो भिक्षु पापी इच्छेनें तृष्णावश होऊन आपणास ध्यानसमाधि प्राप्त झाल्याच्या खोट्या गप्पा (लोकांस) सांगेल, तो अश्रमण होईल, अशाक्यपुत्रीय होईल........ह्मणून यावज्जीव ही गोष्ट तूं करितां कामा नये.

उ०:- होय महाराज.

या उपसंपदाविधीच्या संक्षिप्त वर्णनावरून भिक्षूस मुख्यत: कोणकोणते नियम पाळावे लागतात याची आपणास थोडीबहुत कल्पना करितां येईलच. आतां श्रामणेर ह्मणजे काय ? हें थोडक्यांत सांगतों.
« PreviousChapter ListNext »