Bookstruck

परिशिष्ट ३ 3

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »
५.सम्यक् आजीव:- वाईट मार्गानें आपली उपजीविका न करिता सन्मार्गानेंच ती करणें, याला म्हणतात सम्यक् आजीव.

६.सम्यक् व्यायाम:-  जे वाईट विचार मनांत आले नसतील, त्यांना उत्पन्न होण्यास सवड न देण्याविषयी प्रयत्न, जे वाईट विचार मनांत उद्भवलें असतील, त्यांचा नाश करण्याचा प्रयत्न. जे सुविचार मनात उद्भवले नसतील, ते उत्पन्न करण्याचा प्रयत्न व जे सुविचार मनांत उद्भवले असतील, ते वाढवून त्यांना पूर्णतेला नेण्याचा प्रयत्न या चार मानसिक प्रयत्नांला सम्यक् व्यायाम म्हणतात.

७.सम्यक् स्मृति:-
शरीर अपवित्र पदार्थांचें बनलें आहे हा विवेक जागृत ठेवणें, शरीरांतील सुख:दु:खादि वेदनांचे वारंवार अवलोकन करणें, स्वचित्ताचें अवलोकन करणें, आणि कार्यकारणपरंपरा इत्यादि तात्त्विक गोष्टीचें चिंतन करणें, ह्या चार प्रकारांनी चित्ताला जागृत ठेवणें, याला म्हणतात सम्यक् स्मृति.

८.सम्यक् समाधि:
- सगळ्या कामवासनांचा निरोध करुन व इतर दृष्ट मनोवृत्तींचा निरोध करुन योगी वितर्क आणि विचार यांनी युक्त आणि विवेकापासून उत्पन्न झालेल्या प्रीतीनें आणि सुखानें युक्त असें प्रथम ध्यान संपादन करितो; वितर्क आणि विचार हे शांत झाल्यावर जी चित्ताची प्रसन्नता, जी चित्ताची एकाग्रता, तिनें युक्त, वितर्कविचारविरहित व समाधीपासून उत्पन्न झालेल्या प्रीतीनें आणि सुखानें युक्त असें द्वितीय ध्यान संपादन करितो; प्रीतीच्या त्यागानें तो उपेक्षायुक्त होतो, व जागृत (स्मृतिमान्) होत्साता समाधिसुखाचा अनुभव घेतो, त्याला आर्यजन उपेक्षायुक्त स्मृतिमान् आणि सुखी असें म्हणतात, अशा प्रकारचें तो तृतीय ध्यान संपादन करितो; सौमनस्य आणि दौर्मनस्य यांचा पूर्वीच नाश झाल्यावर सुख आणि दु:ख यांचा निरोध करुन तो सुखदु:खविरहित व उपेक्षा आणि जागृति (स्मृति) यांनी परिशुद्ध असें चतुर्थ ध्यान संपादन करितो. ह्याप्रमाणे चार ध्यानें संपादन करणें याला सम्यक् समाधि असें म्हणतात.१
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
(१- हीं ध्यानें संपवण्याचा मार्ग दुसर्‍या व्याख्यानांत सांगितला आहे.)
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
बुद्ध भगवंतांनी या आर्य अष्टांगिक मार्गाला मध्यम मार्ग असें म्हटलें आहे. त्याचें प्रत्येक अंग दोन अंतांच्या मध्यें आहे. उदाहरणार्थ, चैनी लोकांची दृष्टि म्हटली म्हणजे खावें प्यावें मजा मारावी. हा दृष्टीचा एक अंत. तापसी लोकांची दृष्टि म्हटली म्हणजे व्रतांनी शुद्धि, तपानें शुद्धि, देहदंडनानें शुद्धि हा दुसरा अंत. पहिला अंत चैनीचा आणि दुसरा अंत देहदंडनाचा यांच्या मधला मार्ग म्हटला म्हणजे चार आर्यसत्यांचे यथार्थ ज्ञान. चैनी लोक म्हणतात वाटेल ते संकल्प संकल्पावे. तापसी म्हणतात संकल्पांचा समूळ नाश करावा. या दोन अंतांच्या मधला मार्ग म्हटला म्हणजे सम्यक् संकल्प. याप्रमाणें बाकी अंगांचीहि मध्यवर्तिता जाणावी.
« PreviousChapter ListNext »