Bookstruck

प्रकरण एक ते बारा 105

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »
तदनंतर आश्वलायन त्या ब्राह्मणसमुदायाह बुद्ध भगवंताजवळ गेला आणि कुशलसमाचारादिक विचारून झाल्यावर ते सर्वजण एका बाजूला बसले. तेव्हा आश्वलायन म्हणाला, “भो गोतम ब्राह्मण म्हणतात, ‘ब्राह्मण वर्णच श्रेष्ठ आहे, इतर वर्ण हीन आहेत. ब्राह्मण वर्णच शुक्ल आहे, इतर वर्ण कृष्ण आहेत, ब्राह्मणांनाच मोक्ष मिळतो, इतरांना नाही. ब्राह्मण ब्रह्मदेवाच्या मुखापासून झाले ते त्याचे औरस पुत्र. अर्थात तेच ब्रह्मदेवाचे दायाद होत,’ भो गोतम यासंबंधी आपले मत काय?”

भगवान—हे आश्वलायना, ब्राह्मणांच्या बायका ऋतुगती होतात, गरोदर होतात, प्रसूत होतात, आणि मुलांना दूध पाजतात. याप्रमाणे ब्राह्मणांची संतति इतर वर्णासारखीच मातेच्या उदरातून जन्मली असता, ब्राह्मणांनी आपण ब्रह्मदेवाच्या मुखापासून उत्पन्न झालो, असे म्हणावे हे आश्चर्य नव्हे काय?

आ.—भो गोतम, आपण काही म्हणा, पण ब्राह्मण ब्रह्मदेवाचे दायाद आहेत, यावर ब्राह्मणांचा पूर्ण विश्वास आहे.

भ.—हे आश्वलायन, यौन, कांबोज वगैरे सरहद्दीवरील प्रदेशात आर्य आणि दास असे दोनच वर्ण असून कधी कधी आर्याचा दास आणि दासाचा आर्य होतो, ही गोष्ट तुझ्या ऐकण्यात आली आहे काय?

आ.—होय, असे मी ऐकले आहे.

भ.—असे जर आहे, तर ब्रह्मदेवाने ब्राह्मणांना मुखापासून उत्पन्न केले व ते सर्व वर्णात श्रेष्ठ आहेत या म्हणण्याला आधार काय?

आ.—आपले म्हणणे काही असो, पण ब्राह्मणांची अशी बळकट समजूत आहे की, ब्राह्मण वर्णच काय तो श्रेष्ठ आणि इतर वर्ण हीन आहेत.

भ.—क्षत्रियाने, वैश्याने किंवा शुद्राने प्राणघात, चोरी, व्यभिचार, खोटे भाषण, चहाडी, शिवीगाळ, वृथा बडबड केली, लोकांच्या धनावर दृष्टि ठेवली, द्वेषबुद्धी वाढविली, नास्तिकपणा अंगीकारला, तर तोच काय तो देहत्यागानंतर नरकाला जाईल, पण ब्राह्मणाने ही कर्मे केली तर तो नरकाला जाणार नाही, असे तुला वाटते काय?

आ.—भो गोतम, कोणत्याही वर्णाच्या मनुष्याने ही पापे केली असता तो मरणोत्तर नरकाला जाईल. ब्राह्मण काय किंवा अब्राह्मण काय सर्वांनाच आपल्या पापाचे प्रायश्चित्त भोगावे लागणार.

भ.—एखादा ब्राह्मण प्राणघातापासून निवृत्त झाला, चौर्यकर्म, व्यभिचार, असत्य भाषण, चहाडी, शिवीगाळ, वृथाप्रलप, परधनाचा लाभ, द्वेष आणि नास्तिकता या (दहा) पापांपासून निवृत्त झाला तर तोच काय तो देहावसानांतर स्वर्गाला जाईल, पण इतर वर्णाचे लोक या पापापासून निवृत्त झाले तर ते स्वर्गाला जाणार नाहीत, असे तुला वाटते काय?

आ.—कोणत्याही वर्णाचा मनुष्य या पापकर्मापासून निवृत्त झाला तर स्वर्गाला जाईल, पुण्याचरणाचे फळ ब्राह्मणाला काय किंवा ब्राह्मणेतराला एक सारखेच मिळेल.

भ.—या प्रदेशात ब्राह्मणच काय तो द्वेषवरविरहित मैत्रीभावना करू शकतो, पण क्षत्रिय, वैश्य आणि शुद्र ती भावना करू शकत नाहीत, असे तुला वाटते काय?

आ.—चारी वर्णांना मैत्रीभावना करता येणे शक्य आहे.

भ.—तर मग ब्राह्मण वर्णच श्रेष्ठ, आणि इतर वर्ण हीन आहेत या म्हणण्यात अर्थ कोणता?
« PreviousChapter ListNext »