Bookstruck

प्रकरण एक ते बारा 112

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »
अस्पृश्यतेचा परिणाम

याप्रमाणे जेते लोक हिंदुसमाजात मिसळून गेले तरी अस्पृश्याचीं परिस्थिती सुधारली नाही. जैन आणि बौद्ध श्रमणांनी त्याची हेळसांड केली आणि त्यामुळे उत्तरोत्तर अस्पृश्याविषयी तिटकारा वाढत गेला, नाहक त्यांचा छळ होऊ लागला. आणि त्याचा परिणाम हळूहळू सर्व समाजाला  खुद्द जैनांना आणि बौद्धांना भोगावा लागला.

जातिभेद दृढ होत गेल्यावर जैन व बौद्ध सर्व जातींची भिक्षा स्वीकारतात म्हणून निंद्य ठरावयाला लागले. जैन संघात अस्पृश्याला घेण्याची मनाई होती, तरी शुद्राला घेत असत असे वाटते. बौद्ध संघात तर शेवटपर्यंत जातिभेदाला थार नव्हता. पण समाजात जातिभेद बळावला आणि ब्राह्मणांना शंबुकच्या गोष्टीसारख्या गोष्टी रचून लोकप्रिय पुराणात दाखल करणे शक्य झाले. होता होता बौद्ध श्रमण निखालस नष्ट झाले व जैन श्रमण जेमतेम कसेबसे जीव बचावून राहिले. त्यांच्या हातून समाजसंशोधनाचे कोणतेही महत्त्वकार्य घडून आले नाही.

भिक्षुसंघाची अन्य देशांतील कामगिरी


जातिभेदासमोर बौद्ध भिक्षुसंघ हिंदुस्थानात टिकाव धरून राहू शकला नाही. तथापि बाहेरच्या देशात त्याने मोठीच कामगिरी बजावली आहे. दक्षिणेला सिंहलद्वीप, पूर्वेला ब्रह्मदेशापासून तहत्त जपानपर्यंत आणि उत्तरेला तिबेट, मंगोलिया वगैरे देश या सर्व ठिकाणी बौद्ध संघाने बहुजनसमाजाला एका काळी सुसंस्कृत करून सोडले. उत्तरेला हिमालयावरून आणि दक्षिणेला व पूर्वेला समुद्रातून वास करून अनेक भिक्षूंनी बौद्ध संस्कृतीची पताका या सर्व देशावर फडकवत ठेवली. याचे बीज वर दिलेल्या बुद्धाच्या उपदेशात आहे. बुद्धाने जातिभेदाला यत्किंचित थारा दिला असता तर त्याच्या अनुयायी भिक्षुंनी म्लेच्छ समजल्या जाणार्‍या देशात संचार करून बौद्ध धर्माचा प्रसार केला नसता. जातिभेदामुळे आमची हानि झाली, पण पूर्ण आशिया खंडाचा फायदा झाला, अस म्हणावे लागते!

« PreviousChapter ListNext »