Bookstruck

नवजीवन 13

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

‘नाही.’

‘परंतु पेल्यांत पूड टाकून दिलीस ना?’

‘हो. परंतु त्याला झोप लागावी म्हणून. त्या पुडीने काही अपाय होईल अशी मला कल्पनाही नव्हती. माझ्या मनात तसा विचारही नव्हता. तशी इच्छाही नव्हती. देव साक्षी आहे. माझ्या मनात खरोखर काही वाईट नव्हते.’

‘तू पैसे चोरले नाहीस. परंतु पुड दिल्याचे कबूल करतेस. होय   ना?’

‘हो. परंतु ती झोपेची समजून मी दिली. त्याला झोप लागावी एवढयाच हेतूने.’

‘हे बघ, तू सारे खरे सांग बघू. खरे सांगशील तर ते तुझ्याच हिताचे आहे. सांग-’

‘काय सांगू? मी हॉटेलात गेले. त्याची खोली मला दाखवण्यात आली. त्या खोलीत तो होता. दारू पिऊन तर्रर्र होता. मी ‘नको’ सांगून परत जाऊ इच्छीत होते. परंतु तो जाऊ देईना.’

‘पुढे?’

‘पुढे काय? थोडा वेळ तेथे राहिले नि मी परत गेले.’

‘या व्यापार्‍याचा नि या रामधनचा आधीपासून परिचय होता का?’

‘हो.’

‘त्या रामधनचा नि तुझा काय संबंध?’

‘तो पाहुण्यांसाठी मला बोलावतो. त्याचा माझा दुसरा काही संबंध नाही.’

‘तुलाच तो का बोलावतो?’

‘ते मी काय सांगू? त्याच्या मनात येईल तिला तो बोलावतो.’ असे बोलून रूपाने प्रतापकडे पाहिले. तिने त्याला का ओळखले? प्रभूला माहीत.

‘तुझा एकंदरीत रामधनशी फारचा परिचय नाही. ठीक. पुढे?’

‘पुढे काय? मी घरी गेले. धनिणीजवळ पैसे दिले. मी झोपले; परंतु डोळा लागतो तो मला परत उठवण्यात आले. परंतु धनिणीने हुकूम दिला. चाळीस रूपये तो ठरवीत होता. तो पैसे घेऊन आला नव्हता. त्याने मला पैसे घेऊन येण्यासाठी किल्ली दिली.’

‘तू गेलीस हॉटेलात. पुढे?’

‘मी त्या खोलीत गेले. परंतु एकटी नाही गेले. रामधन नि रमी यांनाही बोलावले.’

‘साफ खोटे.’ दोघे खवळून म्हणाली.

‘दोघे माझ्याबरोबर होती. मी त्यांच्यादेखत दहादहाच्या चार नोटा काढून घेतल्या.’

‘पाकिटात किती पैसे होते?’

‘मी मोजले नाहीत. परंतु शंभराच्याही काही नोटा होत्या.’

‘बघा. आरोपी शंभराच्या नोटा पाहिल्याचे सांगत आहे.’ रामधन नि रमीचा वकील म्हणाला.

« PreviousChapter ListNext »