Bookstruck

नवजीवन 21

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

‘परंतु हीच बया मुख्य कारस्थानी दिसते. हिनेच त्याला ठार केले असावे. मोहिनी घालणारी ही डाकीण आहे. तुम्ही योग्य तो न्याय द्या. समाजाचे हित डोळयांसमोर ठेवून न्याय द्या. हिने पाकिटात ते पैसे पाहिले, म्हणून ती पुन्हा आली. दिले विष. रामधन आणि रमी दिसतांच त्यांनाही हिने वाटणी दिली. आणि शेवटी विष!’ असे सरकारी वकील म्हणाला.

‘जिने विष दिले तिनेच पैसे चोरले असले पाहिजेत. पूड दिल्याचे ती कबूल करते. उगीच कशाला कोणी विष चारील?’

‘परंतु झोपेसाठी तिने पूड दिली. त्या दोघांनी हिला फसविले. ती दोघे मुख्य गुन्हेगार आहेत.’

‘हिनेच आजपर्यंत अनेकांना फसविले असेल; केसाने गळा कापला असेल. या जारिणींना आम्ही नीट ओळखतो. किती तरी असे खटले आजपर्यंत नमी चालविले आहेत.’

अशा चर्चा चालल्या होत्या. शेवटी पुढील निर्णय ठरला.

१) रामधन दोन्ही गोष्टीत, चोरी आणि विष यांत अपराधी.

२) रमीही तद्वतच दोन्ही गुन्हे करणारी.

३) रूपा फक्त चोरीत सामील. विष देण्यांत तिचा हात नाही. कारण झोपेसाठी म्हणून तिने पूड दिली. तिच्यावर दया दाखविली जावी.

परंतु हा निर्णय जरा चमत्कारिक होता. तिने जर झोपेसाठी पूड दिली असेल, तर तिने चोरी कशी केली असेल? चोरी केली असेल तरच तिने विषही दिले असेल. तुम्ही चोरी केली म्हणता आणि विष मात्र दिले नाही, तर झोपेची पूड दिली म्हणता. ही विसंगती. प्रताप म्हणाला, ‘मला ती संपूर्णपणे निर्दोष वाटते.’

‘नि पैसे घेतले नाहीत. अंगठी त्यानेच दिली. तर मग ती विष कशासाठी देईल?’ पुन्हा कोणी बोलला.

‘चोरी करायचा हेतु नसता विष दिले असे म्हणावे.’ एकाने सुचविले.

‘परंतु ‘दया करा’ असे पुढे जोडा.’ व्यापारी म्हणाला.

‘निरपराधी आहे असेच म्हणा ना.’ प्रतापने सुचविले.

‘अहो, तिचा चोरीचा हेतु नाही असे म्हटले म्हणजे तोच नाही का अर्थ निघत?’

‘बरे बरे; चला आटपा.’ सारे म्हणाले.

« PreviousChapter ListNext »