Bookstruck

नवजीवन 38

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

‘एक काम झाले. मला तुझ्याजवळ थोडे बोलायचे आहे.’

‘बोला.’

‘या अर्जाचा काही उपयोग नाही झाला तर शेवटी राजाकडे दयेचा अर्ज करू.’

‘तुमचा माझा संबंध आहे हे त्या दिवशी ज्यूरीतील सर्वांना, तसेच न्यायाधीशाला कळले असते तर त्यांनी मला सोडले असते.’

‘तिचे म्हणणे खरे होते. परंतु त्याला त्या वेळेस तसे नीतिधैर्य झाले नाही. तिचे शब्द ऐकून त्याला वाईट वाटले.

‘तुम्हांला मी एक काम सांगते. येथे तुरूंगात एक बाई आहे. तिचा मुलगाही. काहीही अपराध नसता त्यांना अटक करण्यांत आली. तुम्ही तिच्या मुलाला भेटा. तो हकीकत सांगेल. काही करता आले तर करा.’

‘मी खटपट करीन. रूपा, तुझ्याजवळ थोडे बोलायचे आहे.’

‘मागे थोडे का बोललेत? आता अजून काय बोलायचे शिल्लक आहे?’

‘मी तुझी क्षमा मागतो.’

‘केलेल्या पापांचे मी परिमार्जन करू इच्छितो.’

‘कशासाठी?’

‘कर्तव्य म्हणून, देवासाठी.’

‘कोणता देव आज तुम्हांला सापडला, आज पाठवला? माझा देव कधीच मेला आहे.’

‘तुझा देव मेला?’

‘हो, मेला. तुम्हीच तो मारलात. आता देव तुम्हांला आठवतो? शुध्दीवर आहात का? देव, कोणता देव, शिल्लक उरला आहे? त्या वेळेस सारे देव मेले होते? आज त्यांची भुते झाली वाटते?’

‘शान्त राहा.’

‘का राहू शान्त?’

‘मी तुझी क्षमा मागतो आहे.’

‘माझी क्षमा? मी कोण? मी एक सामान्य कैदी आहे. मी एक वेश्या. तुम्ही प्रतिष्ठित, अब्रूदार जमीनदार, तुम्ही सदगृहस्थ, तुम्ही माझ्याकडे नका येऊ. माझ्या स्पर्शाने मलिन नका होऊ. श्रीमंत बायकांकडे तुम्ही जा. माझी किंमत कागदाच्या चिटोर्‍याइतकी. माझी किंमत फार तर शंभर रूपये!’

‘रूपा, तू कितीही निष्ठुरपणे बोललीस तरी माझ्या मनांतील भावना तू बोलू शकणार नाहीस. मी किती अपराधी म्हणून मला वाटत आहे, त्याची तुला काय कल्पना?’

‘अपराधी वाटते आहे? त्यावेळेस वाटले का? त्या वेळेस एक नोट अंगावर फेकून चालते झाले! जी माझी किंमत; तीच तुमचीही किंमत!’

‘होय. मी माझी किंमत अधिक नाही समजत. परंतु जे झाले ते थोडेच परत येणार आहे? आता त्याचे काय? मी तुला यापुढे न सोडायचे ठरविले आहे. आणि मनात जे ठरविले आहे तदनुसार मी वागणार आहे.’

« PreviousChapter ListNext »