Bookstruck

नवजीवन 53

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

‘हो, तू तुरूंग-सुधारणा हाती घेतली आहेस. ऐकले खरे. मला तरी सांग तुझा कार्यक्रम.’

‘येथे रस्त्यात काय सांगू? किती सांगू?’

‘तू राहतोस तरी कोठे?’

‘असाच कोठे तरी. अच्छा. जातो. रागावू नको.’

‘अरे रागावेन कसा?’

प्रताप वेगाने तेथून सटकला. त्याचा तो अगडबंब मित्र त्याच्याकडे बघतच राहिला. प्रताप सरळ एका सुप्रसिध्द वकिलाकडे आला. त्याने त्या तरूणाची नि त्याच्या आईची सारी हकीगत सांगितली.

‘अहो, त्यानेच, त्या खानावळवाल्यानेच स्वत: आग लावली. घराचा विमा उतरलेला. त्या तरूणाचा नि त्याच्या आईचा गुन्हा शाबीतही झाला नाही.’

‘मी आपील करतो. अपिलात सुटतील.’

प्रतापने तुरूंगात उडाणटप्पूच्या बेकारीच्या नावाने डांबून ठेवलेल्या काही माणसांचीही हकीगत सांगितली. ‘त्या बाबतीत लक्ष घाला. मी पैसे देईन खर्चाचे.’ तो म्हणाला.

ती दोन कामे आटोपून तो जेलखात्याच्या सर्वप्रमुख अधिकार्‍याच्या भेटीस गेला. तो अधिकारी अध्यात्मवादी म्हणून प्रसिध्द होता. प्रतापला वाटले की, या अध्यात्मवादी पुरूषाजवळ तरी थोडी दया, न्यायबुध्दी असेल. आध्यात्मवाद्यांचे अध्यात्म पुस्तकांपुरते, फावल्या वेळेस चर्चेपुरते असते, ही गोष्ट त्याच्या लक्षात आली नाही.

‘या प्रतापराव. अलीकडे तुमच्यात फार क्रान्ती झाली आहे असे ऐकतो.’

‘थोडेसे खरे आहे. मी तुमच्याकडे कामासाठी आलो आहे. राजकीय कैद्यांसंबंधी काम आहे. नगरच्या किल्ल्यांत एक तरूण मुलगी स्थानबध्द करून ठेवण्यांत आली आहे. तिचा खरोखर गुन्हा नाही. तिला सोड तरी! निदान तिच्या आईची तिला भेट तरी घेता येऊ दे. तिची आई तडफडत आहे. त्याच किल्ल्यात दुसरा एक तरूण आहे. त्याला तुम्ही वाचायला, अभ्यास करायला, पुस्तकेही देत नाही.’

‘साफ खोटे. तेथे पुस्तके आहेत. परंतु यांना वाचायला नको. कितीतरी धार्मिक पुस्तके तेथे आहेत. परंतु ती जशीच्या तशी पडून आहेत.’

‘त्याला शास्त्रीय पुस्तके हवी आहेत.’

‘यांच्या नेहमी तक्रारी असतात. सारी ढोंगे. सरकारविरूध्द आरडाओरडा करायचा. खरे म्हणजे पूर्वीपेक्षा किती यांना सुख आहे!’

‘त्यांना लिहायसाठी वह्या हव्या आहेत.’

« PreviousChapter ListNext »