Bookstruck

नवजीवन 80

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

आईबापांना पूर्वी देव मानीत, आता समाजाला देव मानतील असे आम्ही करू म्हणून म्हणत आहात. परंतु मला तुमच्या उथळ उत्साहाचे हसू येते. तुमची तळमळ प्रणामार्ह आहे. परंतु तळमळ झाली तरी तीसुध्दा शास्त्रशुध्द हवी, खोल सत्यावर आधारलेली हवी. आणि मानवी मन हे सुटसुटीत सोपे नाही; हे ध्यानात धरा. कोटयावधी वर्ष उत्क्रान्त होत आलेले हे मानवी मन, ग्रहातून, उपग्रहांतून, झाडामाडांतून, पशुपक्ष्यांतून, नाना योनींतून क्रान्त उत्क्रान्त होत आलेला हा मानव आणि त्याचे मन आणि मेंदू, हृदय आणि बुध्दी, या साध्या वस्तू नाहीत. त्याच्या इतर वृत्ती दडपल्याने त्या कायमच्या दडपल्या जाणार नाहीत. तुम्हांला वाटेल, सारे जग आम्ही सुधारले. तर पुन्हा केव्हा सुप्त वृत्ती पेट घेतील, व्यक्तिगत स्वतंत्र भावना वर उफाळेल याचा नेम नाही. म्हणून आम्ही म्हणतो की, केवळ दडपेगिराने सामाजिक, आर्थिक वा राजकीय क्रान्ति करण्याचा प्रयत्न आततायीपणाचा होईल.’ प्रसन्न म्हणाला.

‘रमण आजारी आहे, पुरे चर्चा.’ अरूणा म्हणाली.

‘या चर्चा म्हणजे माझे अमृत रसायन.’ रमण म्हणाला. परंतु प्रताप उठला. प्रसन्नही उठला.

‘तुमच्याजवळ मला थोडे बोलायचे आहे.’ प्रसन्न म्हणाला.

‘माझ्याजवळ?’ प्रतापने विचारले.

‘हो. चला तिकडे.’

दोघे जरा बाजूला गेले. प्रसन्न गंभीर होता. क्षणभर कोणी बोलेना.

‘बोला. संकोच नको.’ प्रताप म्हणाला.

‘मला रूपाविषयी बोलायचे आहे.’

‘रूपा सुखी दिसली. ती सेवापरायण होत आहे. मला किती आनंद झाला. तिच्या डोळयांत निर्मळपणा दिसला.’

‘हो. ती सुखी आहे. आणि खरे सांगू का, मला तिच्याविषयी प्रेम वाटते. मी लग्न करायचे नाही या मताचा. परंतु रूपाने मला जिंकले. दोन दिवसांचा परिचय. परंतु काय असेल ते असो. दोघांना काळया पाण्याची शिक्षा. दोघांची शिक्षा साधी. आम्ही झोपडी बांधू. पुढे जगलो वाचलो तर राष्ट्रसेवा करायला येऊ. तुमची संमती हवी.’

‘रूपाची शिक्षा साधी झाल्याचे तुम्हांला कळले वाटते?’

‘तिनेच मघा जेवतांना सांगितले. तुम्हीच तिला ती बातमी दिलीत. आम्ही दोघे जवळजवळ जेवायला बसलो होतो. मित्र थट्टा करतात. तुमचे मत काय? रूपा मला म्हणाली की तुमची संमती हवी.’

‘मी कोण संमती देणारा? हा तिचा प्रश्न आहे. तिला तिचे स्वातंत्र्य आहे. कोठूनही ती सुखी होवो.’

« PreviousChapter ListNext »