Bookstruck

नवजीवन 83

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

‘झाली पंचवीस वर्षे. परंतु ते मला नास्तिक समजतात. स्वत:च्या आत्म्यावर विश्वास नसणारे समजून दगड मारतात. एकदा तर पोलिसांनी मला पकडले. म्हणाले, नाव काय तुझे? परंतु ज्याने सर्वसंगपरित्याग केला, त्याला नाव तरी कसे राहील? मी त्यांना म्हटले, मला नाव ना गाव. मी मनुष्य आहे. बस्स. माझे वय विचारीत! वेडे कुठले. मी कोठे माझे वय मोजीत बसू? मी अनादी अनन्त आहे. मी सदैव होतो, पुढे सदैव असेन. मला म्हणाले, तुझे आईबाप कोण? म्हटले धरित्री ही माता, विश्वात्मा विश्वंभर माझा पिता. मला म्हणाले, राजा मानतोस की नाही? मी म्हटले तो राजा, तसा मी राजा. जो तो स्वत:च राजा आहे. मला पागल समजून त्यांनी मला सोडून दिले. कोण पागल? ते का मी?

‘आणि तुम्ही कोठे राहता, कोठे असता?’

‘हे विश्व माझे घर. पाय नेतील तेथे मी जातो. काम आढळले तर काम करतो. नसेल तर आराम करतो. मला ना आसक्ती, ना बंध. कधी भिक्षाही मागतो.’

प्रतापने खिशांतून नोट काढून त्याच्यापुढे ठेविली. तो भिकारी म्हणाला, ‘असली भिक्षा मी स्वीकारीत नसतो. मी भाकरीचा तुकडा कधी मागतो. या नोटा, ती नाणी त्यांची मला गरज नाही. तो बोजा तुमचा तुम्ही ठेवा.’

‘क्षमा करा. मला काय माहीत?’

‘क्षमा करण्यासारखे यात काय आहे? तुम्ही काही माझा अपमान नाही केलात. आणि माझा अपमान कोण करू शकेल? मला कशाचा राग, ना लोभ. ना क्रोध, ना संताप.’ असे म्हणून झोळी खांद्यावर टाकून तो वृध्द मनुष्य निघून गेला. प्रताप त्याच्याकडे बघत राहिला.

‘ही मुक्त पुरूषाची स्थिती?’ तो मनात म्हणाला.

आज रात्री दुसरी खास आगगाडी यायची होती. प्रताप त्या धर्मशाळेत आला. सर्वांची तयारी होत होती. सायंकाळ झाली होती. पहारेकरी फिरत होते. रूपा त्या मातृहीन मुलीला खांद्याशी धरून निजवीत होती.

‘हे पहा, रमणचा ताप वाढला आहे. तो वातात आहे. येथील स्थानिक दवाखान्यात किंवा येथील स्थानिक तुरुंगात तरी त्याला ठेवतील असे करा.’ अरूणा प्रतापला म्हणाली.

प्रताप रमणजवळ बसला.

‘रमण’ त्याने हाक मारली.

तो वातात होता. ‘ही बलिदाने फुकट नाही जाणार. बंधने तुटतील. घरोघर विकास होईल. सुखाचा सागर उचंबळेल.’ तो म्हणत होता.

प्रतापला अती दु:ख झाले. हा तरूण का देवाघरी जाणार? त्याला क्रांतिकारकांविषयी प्रेम वाटू लागले होते. मनातील पूर्वीच्या पांढरपेशी अढया नष्ट झाल्या होत्या. तो अधिकार्‍यांना भेटला. त्याने त्यांना लाच दिली. काय करणार? शेवटी स्थानिक दवाखान्यात त्याला न्यायचे ठरले.

रात्री गाडी आली. रमणला सोडून जाताना सर्वांचे डोळे भरून आले.

‘मी राहू का शुश्रुषेला?’ अरूणाने विचारले.

‘निघा. वाटेल ते आता विचारू नका. शक्य ते आम्ही केले आहे. या सद्गृहस्थांना विचारा.’ बडा अंमलदार म्हणाला.

« PreviousChapter ListNext »