Bookstruck

खरा समाजधर्म 5

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

प्रस्तुत निबंधाच्या शेवटीं श्री धर्मानंद कोसंबीनीं पार्श्वनाथांच्या मारणांतिक सल्लेखनेचा थोडासा उहापोहा केला आहे. पार्श्वनाथाप्रमाणें स्वतः देखील याच प्रकारें देह सोडावा असा धर्मानंदजींचा संकल्प होता व तो त्यानीं अमलांत आणण्याची सुरवातही केली होती. पण महात्मा गांधीनीं त्यांना त्यापासून परावृत्त केलें. पण एकदां जगण्याची वृत्ति जी त्यानीं मागे खेचली ती पुन्हां दृढ होईना; आणि त्यामुळें त्यांचा देहांत झाला. मारणांतिक सल्लेखनेला यामुळें तात्विक चर्चेंहून अधिक महत्व आलें आहे.

मारणांतिक सल्लेखना म्हणजे प्रायोपवेशन अथवा आमरण उपवास.

आपल्या हातून अक्षम्य महापातक घडलें असेल तर कित्येक लोक प्रायश्चित्त म्हणून अन्नत्याग करून देह सोडतात. केलेल्या प्रतिज्ञेचें पालन होऊं शकलें नाहीं म्हणून देहत्याग केल्याचीं उदाहरणें आपण वाचतो. 'विकारी वासना उत्कट झाली आहे आणि संयम उरला नाहीं असा स्वतःविषयी अनुभव आला असताना आपल्या हातून आतां पाप खात्रीनें घडणार असें ज्याला वाटूं लागेल त्यानें पाप टाळण्यासाठीं वाटल्यास स्वेच्छेनें देहत्याग करावा; तसें करण्याचा त्याला अधिकार आहे. पण हातून पाप होऊन गेल्यानंतर उपरति झाली असतां प्रायश्चित्त करून शुद्ध होणेंच चांगलें. पापाविषयीं उपरति झाल्यानंतर वैतागानें देहत्याग करणें अयोग्य आहे ' असा महात्मा गांधीजींचा अभिप्राय आहे.

वृद्धावस्था झाली आहे; हातून शारीरिक किंवा मानसिक कसलीच सेवा होऊं शकत नाहीं; आत्मोद्धारासाठीं कराव्या लागणार्‍या साधनेचें पालन करण्याचें सामर्थ्यही उरलें नाहीं: आतां आपण केवळ पृथ्वीला म्हणजेच समाजाला भाररूप झालों आहोंत; असें ज्याना वाटतें त्यानीं खितपत पडून राहण्यापेक्षां प्रायोपवेशन करून मरण गांठावें हा एक शुद्ध सामाजिक धर्म आहे. पांडव, विदुर वगैरे पीराणिक व्यक्तींनी या धर्माचें पालन केलें आहे. बंगल्यांत पावहारी बुवानीं अशाच रीतीनें देहत्याग केल्याची उदाहरणं स्वामी विवेकानंदानीं नमूद करुन ठेवलें आहे. एखादा दुर्धर आणि सांसर्गिक रोग जडला असतानां आपण यांतून वाचूं शकत नाहीं अशी मनाची खात्री झाली म्हणजे मनुष्यानें प्रायोपवेशन करून देह सोडणें योग्य आहे. आपलें जीवन समाजाला बाधक होऊं नये अशी चिंता ज्याप्रमाणें प्रत्येकानें बाळगावयाची असते त्याचप्रमाणें आपलें मरणहीं समाजाला बाधता कामा नये अशी काळजी बाळगणें समाजधर्माला धरूनच आहे.

आत्महत्या करणें हा एक सामाजिक गुन्हा आहे असें सर्वत्र मानलें जातें. आत्महत्या करणार्‍याला मोक्ष मिळत नाहीं, त्याची अधोगति होते असें सर्व धर्मशास्त्रें देखील म्हणतात. कायदा आणि धर्मशास्त्र यांची ही दृष्टी आणि वरील प्रायोपवेशन धर्म याची एकवाक्यता कशी करावयाची हा एक प्रश्न आहे.

मनुष्याला केव्हां ना केव्हां मरण हें आपोआप येणारच आहे; पण तें स्वेच्छेनें, आपल्याला वाटेल तेव्हां आपल्यावर ओढवून घेण्याचा हक्क मनुष्याला आहे किंवा नाहीं हाच प्रश्न या चर्चेच्या मुळाशी आहे.

« PreviousChapter ListNext »