Bookstruck

आत्मवाद 11

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »
''पुष्कळ काळानंतर ह्या जगाचा संवर्त (नाश) होतो. अणि त्यांतील बहुतेक प्राणी आभास्वर देवलोकांत जातात. त्यानंतर पुष्कळ काळाने या जगाचा विवर्त (विकास) होऊं लागतो. तेव्हा प्रथमत: रिकामें ब्रह्मविमान उत्पन्न होतें. तदनंतर आभास्वर देवलोकींचा एक प्राणी तेथून च्युत होऊन या विमानांत जन्मतो. तो मनोमय, प्रीतिभक्ष्य, स्वयंप्रभ, अन्तरिक्षचर, शुभस्थायी आणि दीर्घजीवी असतो. त्यानंतर दुसरे अनेक प्राणी आभास्वर देवलोकांतून च्यूत होऊन त्या विमानांत जन्मतात. त्यांना वाटतें हा जो भगवान ब्रह्मा, महाब्रह्मा, तो अभिभू, सर्वदर्शी, वशवर्ती, ईश्वर, कर्ता, निर्माता, श्रेष्ठ, सर्जिता, वशी आणि भूतभव्यांचा पिता आहे.''

'ब्रह्मा देवानां प्रथम:संबभूव विश्वस्य कर्ता भुवनस्य गोप्ता॥'

ह्या मुण्डकोपनिषदाच्या (१। १) वाक्यांत ब्रह्मदेवाची वर दिलेली कल्पना संक्षेपत: निर्देशिली आहे. यावरून ब्रह्मदेवाला जगताचा कर्ता बनविण्याचा ब्राह्मणांचा प्रयत्न स्पष्ट दिसतो. परंतु तो त्या काळच्या श्रमणसंकृतीसमोर टिकूं शकला नाही. खुद्द ब्राह्मणांनाच हा प्रयत्न सोडून देऊन ब्रह्म हा नपुंसकलिंगी शब्द स्वीकारावा लागला. आणि बहुतेक सर्व उपनिषदातून या ब्रह्म शब्दालाच महत्त्व दिलें आहे.

ब्रह्मापासून किंवा आत्म्यापासून जगाची उत्पत्ती कशी झाली याची एक कल्पना बृहदारण्यक उपनिषदांत सापडते, ती अशी :-

आत्मैवेदमग्र असीत् पुरूषविध:......स वै नैव रेमे तस्मादेकाकी न रमते। स द्वितीयमैच्छत्। य हैतावानास यथा स्त्रीपुमांसौ संपरिष्वक्तौ । स इममेवात्मानं द्वेधा पातयत्तत: पतिश्च पत्नी चाभवतां तस्मादिदमर्धबृगलमिव स्व इति।

'सर्वांपूर्वी पुरूषरूपी आत्मा तेवढा होता....तो रमला नाही; म्हणून ( मनुष्य ) एकाकी रमत नसतो. तो दुसर्‍याची इच्छा करूं लागला, आणि जसे स्त्रीपुरूष परस्परांना आलिंगन देतात, तसा होऊन राहिला. त्याने स्वत:ला द्विधा फोडलें. त्यामुळे पति आणि पत्नी झालीं. म्हणून हें शरीर (द्विदल धान्याच्या) दलाप्रमाणें आहे.'

(बृ. उ. १।४। १-३).

आता बायबलांतील उत्पत्तिकथा पाहा. ''मग परमेश्वर देवाने जमिनींतील मातीचा मनुष्य बनविला .....मग देवाने आदामावर (त्या माणसावर) गाढ निद्रा पाडली, आणि त्याची बरगडी काढून तिची स्त्री बनविली...यास्तव पुरूष आपल्या आईबापास सोडून आपल्या स्त्रीशी जडून राहील; तीं दोघे एकदेह होतील.'' (बायबल, उत्पत्ति, अ. २)

ह्या आणि वरील उत्पत्तीत केवढा फरक ! येथे देव सर्व पृथ्वी निर्माण करून मग माणसाला, व त्याच्या बरगडीपासून स्त्रीला उत्पन्न करतो; देव जगापासून अगदीच भिन्न; आणि तेथे पुरूषरूपी आत्मा स्वत:च द्विधा होऊन स्त्री आणि पुरूष बनतो.
« PreviousChapter ListNext »