Bookstruck

यज्ञयाग 8

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »
यावरून असें दिसून येतें की, सामान्य लोकांना गाई आपल्या आप्तेष्टांसारख्या वाटत, आणि यज्ञयागांत त्यांची बेसुमारपणें कत्तल करणें त्यांना मुळीच पसंत नव्हतें. राजांनी अणि श्रीमंत लोकांनी स्वत:च्या गाईंचा वध केला असता, तर त्यांच्या दास, कर्मकारांना रडण्यांचा प्रसंग कमी प्रमाणात आला असता. पण, ज्याअर्थी हीं जनावरे त्यांच्याचसारख्या गरीब शेतकर्‍यांकडून बळजबरीने घेतलीं जात, त्याअर्थी त्यांना अतोनात दु:ख होणें साहजिक होतें. यज्ञासाठी लोकांवर जबरदस्ती कशी होत असे, हें खालील गाथेवरून दिसून येईल.

ददन्ति एके विसमे निविट्ठा
छेत्वा वधित्वा अथ सोचयित्वा।
सा दक्खिणा अस्सुमुखा सदण्डा
स्मेन दिन्नास्स न अग्घमेति।

'कोणी विषम मार्गात निविष्ट होऊन हाणमार करून लोकांना शोक करावयास लावून दान देतात. ती (लोकांच्या) अश्रूंनी भरलेली सदण्ड दक्षिणा समत्वाने दिलेल्या दानाची किंमत पावत नाही.'

त्या काळीं जसे यज्ञयागासाठी तसेच उदरनिर्वाहासाठी .. प्राणी मारले जात; गाईला मारून तिचें मांस चवाठयावर ही..... प्रथा फार होती.* परंतु बुध्दाने जितका यज्ञयागांचा निषेध केला तितका या कृत्यांचा केलेला दिसून येत नाही. चवाठयावर मांस विकण्याची पध्दत बुध्दाला पसंत होती असें समजतां कामा नये. पण एखाद्या यज्ञयागासमोर तिची कांहीच किंमत नव्हती. कसायाच्या हातीं जी गाय पडे आणि जो बैल पडे, ती गाय दुभती नसे आणि तो बैल शेतीला निरूपयोगी झालेला असे; त्याच्याबद्दल कोणी आसवें गाळीत नसत. यज्ञाची गोष्ट निराळी होती. पांचशें किंवा सातशें कालवडी किंवा गोहरे एका यज्ञांत मारावयाचे. म्हणजे शेतीचें किती नुकसान होत असे, आणि त्याबद्दल शेतकरी लोक किती हळहळत, याची नुसती कल्पनाच केली पाहिजे! अशा जुलमांचा निषेध बुध्दाने केला, तर त्याला वेदनिंदक कां म्हणावें?

सुयज्ञ कोणता?


राजांनी आणि श्रीमंत ब्राह्मणांनी कशा रीतीने यज्ञ करावा, हें बुध्द भगवंताने दीघनिकायांतील कूटदन्त सुत्तांत सुचविलें आहे. त्या सुत्तांचा सारांश येणेंप्रमाणें -

एके समयी बुध्द भगवान् मगध देशांत संचार करीत असतां खाणुमत नांवाच्या ब्राह्मणग्रामाला आला. हा गाव मगध देशाच्या बिंबिसार राजाने कूटदन्त नांवाच्या ब्राह्मणाला दान दिला होता. त्या ब्राह्मणाने महायज्ञासाठी सातशें बैल, सातशें गोहरे, सातशें कालवडी सातशें बकरे आणि सातशें मेंढे आणले होते.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
* सेय्यथापि भिक्खवे दक्खो गोघतको वा गोघातकन्तेवासी वा गाविं वधित्वा चातुम्महापथे बिलसो विभजित्वा निसिन्नो अस्स। (सतिपट्ठानसुत्त).
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
« PreviousChapter ListNext »