Bookstruck

यज्ञयाग 13

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »
तो प्रकार पाहून चोर लोक घाबरून गेले. यापुढे सरळपणें चोर्‍या करणें धोक्याचें आहे, असें जाणून त्यांनी तीक्ष्ण शस्त्रें तयार करविलीं, व ते उघडपणें दरोडे घालूं लागले.....

याप्रमाणें दरिद्री लोकांना व्यवसाय न मिळाल्यामुळे दारिद्रय वाढत गेलें. दारिद्रय वाढल्याने चोर्‍या लुटालुटी वाढल्या, चोर्‍या लुटालुटी वाढल्याने शस्त्रास्त्रें वाढलीं, शस्त्रास्त्रें वाढल्याने प्राणघात वाढले. प्राणघात वाढल्याने असत्य वाढलें, असत्य वाढल्याने चहाडखोरी वाढली, चहाडखोरी वाढलयाने व्यभिचार वाढला, आणि त्यामुळे शिवीगाळ आणि वृथा बडबड वाढली. त्यांची अभिवृध्दि झाली. आणि त्यांच्यामुळे मिथ्याद्दष्टि वाढून इतर सर्व असत्यकर्मे फैलावलीं.

महाविजित राजाला पुरोहिताने सांगितलेल्या यज्ञ विधानाचा खुलासा या चक्कवत्तिसीहनाद सुत्तावरून होतो. लोकांकडून जबरदस्तीने जनावरें हिरावून घेऊन त्यांचा यज्ञांत वध करणें हा खरा यज्ञ नव्हे, तर राज्यांतील लोकांना समाजोपयोगी कार्याला लावून बेकारी नष्ट करणें हा होय. बलिदानपूर्वक यज्ञयागांचा कधीच लोप होऊन गेला आहे पण अद्यपि खरा यज्ञ करण्याचा प्रयत्न क्वचित् दिसून येतो. बेकारी कमी करण्यासाठी जर्मनीने आणि इटलीने युध्दसामग्री वाढविली; त्यामुळे फ्रान्स, इंग्लड आणि अमेरिका या राष्ट्रांना देखील युध्दसामग्री वाढवावी लागली. आणि आता प्रसंग हातघाईवर येण्याचा संभव दिसतो. इकडे जपानने तर चीनवर आक्रमण केलेंच आहे; आणि तिकडे मुसोलिनी व हिटलर उद्या काय करतील याचा कोणालाच भरवंसा वाटत नाही.* एक गोष्ट खरी की, या सगळयांचें पर्यवसान रणयज्ञांतच होणार ! आणि त्यांत इतर प्राण्यांपेक्षा मनुष्यप्राण्यांच्याच आहुति जास्त पडणार नाही! हा रणयज्ञ थांबावावयाचा असेल, तर लोकांना
------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
* हा मजकूर चालू युध्दापूर्वी लिहिला होता तो तसाच राहूं दिला आहे.
------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
युध्दसामग्रीकडे न लावतां समाजोन्नातीच्या कामाकडे लांवले पाहिजे.
तेव्हाच बुध्द भगवंताने उपदेशिलेले यज्ञविधान अमलांत येईल. अस्तु.

हे थोडें विषयांतर झालें. बुध्दाच्या यज्ञविधानाच्या स्पष्टिकरणार्थ तें योग्य वाटलें. वर दिलेलीं सुत्ते बुध्दांनतर कांही काळाने रचलीं असलीं तरी, त्यांत बुध्दाने उपदेशिलेल्या मूलभूत तत्त्वांचा खुलासा करण्यांत आला आहे. असा सुयज्ञ उपदेशिणार्‍या गुरूला वेदनिंदक म्हणून त्याची अवहेलना करणें योग्य आहे की काय याचा विचार सुज्ञांनी करावा.
« PreviousChapter ListNext »