Bookstruck

जातिभेद 6

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »
भ.- एखाद्या क्षत्रियकुमाराने ब्राह्मणकन्येबरोबर शरीरसंबंध केला व त्या संबधापासून जर त्याला पुत्र झाला, तर तो पुत्र आईबापासारखाच मनुष्य होईल असें तुला वाटत नाही काय ? त्याचप्रमाणें एखाद्या ब्राह्मणकुमाराने क्षत्रियकन्येशीं विवाह केला व त्या संबंधापासून त्याला पुत्र झाला, तर तो आईबापासारखा न होतां भलत्याच प्रकारचा होईल असे तुला वाटतें काय?

आ.- अशा मिश्र विवाहाने जो मुलगा होतो, तो त्यांच्या आईबापांसारखाच मनुष्य असतो. त्याला ब्राम्हणही म्हणतां येईल किंवा क्षत्रियही म्हणतां येईल.

भ.- पण आश्वलायना, एखाद्या घोडीच्या आणि गाढवाच्या संबंधापासून जें शिंगरूं होतें त्याला त्याच्या आईसारखें किंवा बापासारखें म्हणतां येतें काय? त्याला घोडाही म्हणतां येईल, आणि गाढवही म्हणतां येईल काय?

आ.- भो गोतम, त्याला घोडा किंवा गाढव म्हणतां येत नाही. तो एक तिसर्‍याच जातीचा प्राणी होतो. त्याला आपण खेचर म्हणतों. परंतु ब्राह्मण आणि क्षत्रिय यांच्या संबधापासून झालेल्या मुलामध्ये असा प्रकार आढळून येत नाही.

भ.- हे आश्वलायना, दोघां ब्राह्मण बंधुपैकी एक वेदपठण केलेला चांगला सुशिक्षित, व दुसरा अशिक्षित असेल, तर त्यांत ब्राह्मण कोणत्या भावाला श्राध्दामध्ये व यज्ञामध्ये प्रथम आमंत्रण देतील?

आ.- जो सुशिक्षित असेल त्यालाच प्रथम आमंत्रण दिले जाईल.

भ.- आत असें समज की, या दोघां भावांपैकी एकजण मोठा विद्वान, पण अत्यंत दुराचारी आहे; दुसरा विद्वान नाही, पण अत्यंत आणि सुशील आहे; तर त्या दोघांमध्ये प्रथमत: कोणाला आमंत्रण दिले जाईल ?

आ.- भो गोतम, जो शीलवान असेल त्यालाच प्रथम आमंत्रण दिलें जाईल. दुराचारी मनुष्याला दिलेलें दान महाफलदायक कसें होईल?

भ.- हे आश्वलायना, प्रथमत: तूं जातीला महत्त्व दिलेंस, नंतर वेदपठनाला, आणि आता शीलाला महत्त्व देत आहेस. अर्थात् मी जी चातुर्वर्ण्यशुध्दि प्रतिपादितों, तिचाच तूं अंगीकार केलास.

हे बुध्द भगवंताचें भाषण ऐकून आश्वलायन मान खाली घालून चुप्प राहिला. पुढे काय बोलावें हें त्याला सुचेना. नंतर भगवंताने असितदेवल ऋषीची गोष्ट सांगितली. आणि शेवटी आश्वलायन बुध्दाचा उपासक झाला.
« PreviousChapter ListNext »