Bookstruck

जातिभेद 9

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »
का.- हे महाराज, हा नुसत आवाज (घोष) आहे! समजा एखादा क्षत्रिय धनधान्याने किंवा राज्याने समृध्द झाला, तर त्यांची सेवा चारी वर्णांचे मनुष्य करतील की नाही?

राजा- भो कात्यायन, चारी वर्णांचीं लोक त्याची सेवा करतील.

का.- त्याचप्रमाणें इतर कोणत्याही वर्णाचा मनुष्य जर धनधान्याने व राज्याने समृध्द झाला, तर त्याची सेवा चारही वर्णांचे लोक करतील किंवा नाही?

राजा.- चारी वर्णांचे लोक त्याची सेवा करतील.

का.- तर मग, चारी वर्णांचे मनुष्य समान ठरत नाहीत काय?

राजा.- या दृष्टिने चारही वर्ण खात्रीने समान ठरतात. त्यांत मला कोणताही भेद वाटत नाही.

का.- म्हणून मी म्हणतों की, ब्राह्मण श्रेष्ठ वर्ण इत्यादि जें ब्राह्मणांचे म्हणणें आहे, तो केवळ आवाज होय. क्षत्रिय, ब्राह्मण, वैश्य आणि शूद्र या चारी वर्णांतील माणसांनी प्राणघातादिक पापें आचरिलीं, तर ते सारखेच दुर्गतीला जातील, असें महाराजाला वाटत नाही काय?

राजा.- चारही वर्णांपैकी कोणत्याही मनुष्याने पापकर्म केलें तर तो दुर्गतीला जाईल.

का.- ठीक, महाराज, असें जर आहे, तर चारही वर्ण समान ठरत नाहीत काय? तुम्हांला यासंबंधीं काय वाटतें?

राजा- या दृष्टीने चारही वर्ण खात्रीने समान ठरतात. त्यांच्यांत मला भेद दिसत नाही.

का.- चारही वर्णांपैकी कोणी मनुष्य प्राणघातादिक पापांपासून विरत झाला, तर तो स्वर्गाला जाईल की नाही?

राजा .- तो स्वर्गाला जाईल असें मी समजतों.

का.- आणि म्हणूनच मी म्हणतों की, ब्राह्मण वर्णच श्रेष्ठ, हा नुसता आवाज आहे. हे महाराज, समजा, तुमच्या राज्यांत चारही वर्णापैंकी कोणत्याही माणसाने घरफोडी, लूटालूट, परदारागमन, इत्यादिक अपराध केले, आणि त्याला राजपुरूषांनी आणून तुमच्या समोर उभें केलें, तर त्याला तुम्ही ( त्याच्या जातीकडे न पाहातां) योग्य तो दंड कराल की नाही?
« PreviousChapter ListNext »