Bookstruck

जातिभेद 15

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »
जातिभेद दृढ होत गेल्यावर जैन आणि बौध्द सर्व जातींची भिक्षा स्वीकारतात म्हणून निंद्य ठरावयाला लागले. जैन संघात अस्पृश्याला घेण्याची मनाई होती, तरी शूद्राला घेत असत असें वाटतें. बौध्द संघांत तर शेवटपर्यंत जातिभेदाला थारा नव्हता. पण समाजांत जातिभेद बळावला, आणि ब्राह्मणांना शंबूकाच्या गोष्टीसारख्या गोष्टी रचून लोकप्रिय पुराणांत दाखल करणें शक्य झालें. होतां होतां बोध्द श्रमण निखालस नष्ट झाले, व जैन श्रमण जेमतेम कसेबसे जीव बचावून राहिले! त्यांच्या हातून समाजसंशोधनाचें कोणतेंही महत्कार्य घडून आलें नाही.

भिक्षु संघाची अन्य देशांतील कामगिरी


जातिभेदासमोर बौध्द भिक्षुसंघ हिंदुस्थानांत टिकाव धरून राहूं शकला नाही. तथापि बाहेरच्या देशांत त्याने मोठीच कामगिरी बजावली आहे. दक्षिणेला सिंहलद्वींप, पूर्वेला ब्रह्मदेशापासून तहत जपानपर्यंत, आणि उत्तरेला तिबेट, मंगोलिया वगैरे देश या सर्व ठिकाणीं बौध्द संघाने बहुजनसमाजाला एका कालीं सुसंस्कृत करून सोडलें. उत्तरेला हिमालयावरून आणि दक्षिणेला व पूर्वेला समुद्रांतून प्रवास करून अनेक भिक्षूंनी बौध्द संस्कृतीची पताका या सर्व देशांवर फडकत ठेवली. यांचें बीज वर दिलेल्या बुध्दाच्या उपदेशांत आहे. बुध्दाने जातिभेदाला यत्किंचित् थारा दिला असता, तर त्याच्या अनुयायी भिक्षूंनी म्लेच्छ समजल्या जाणार्‍या देशांत संचार करून बौध्द धर्माचा प्रसार केला नसता. जातिभेदामुळे आमची हानि झाली, पण पूर्व आशिया खंडाचा फायदा झाला, असें म्हणावें लागतें!
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
* ह्यासंबधी Dr. D.R. Bhandarkar यांचा Indian Antiquary,Vol .40 January  1911, PP.  7& 37 मध्यें प्रसिध्द झालेला The Foreign Elements in the Indian Popualtion हा लेख पहावा.
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
« PreviousChapter ListNext »