Bookstruck

दिनचर्या 7

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »
आणि श्रमण गोतम, असे हे मोठमोठाल्या संघाचे पुढारी आजला राजगृहाजवळ वर्षावासाठी राहत आहेत, हें अंगमगधांतील लोकांचे मोठें भाग्य समजलें पाहिजे! पण या पुढार्‍यांत श्रावक ज्याचा योग्य मानमरातब राखतात, असा पुढारी कोण? आणि श्रावक त्याच्या आश्रयाखाली कसे वागतात?

तेव्हा कांही जण म्हणाले,'' हा पूरण कस्सप प्रसिध्द पुढारी आहे. परंतु श्रावक त्याचा मान ठेवीत नाहीत आणि त्याच्या आश्रयाखाली राहूं इच्छित नाहीत. त्यांच्यांत तक्रारी उत्पन्न होतात.'' त्याचप्रमाणें दुसर्‍या कांही जणांनी मक्खलि गोसाल इत्यादि पुढार्‍यांच्या श्रावकांमध्ये कशा तक्रारी होतात, याचें वर्णन केले. अखेरीस कांही जण म्हणाले,'' हा श्रमण गोतम प्रसिध्द पुढारी आहे. त्याचे श्रावक त्याचा योग्य मान राखतात, आणि त्याच्या आश्रयाखाली राहतात. एकदा गोतम मोठया सभेंत धर्मोपदेश करीत होता. तेथे श्रमण गोतमाचा एक श्रावक खोकला. त्याला गुढग्याने दाबून दुसरा हळूच म्हणाला,''गडबड करूं नकोस, आमचा शास्ता (गुरू) धर्मोपदेश करीत आहे.' ज्या वेळी श्रमण गोतम शेंकडो लोकांच्या परिषदेंत धर्मोपदेश करतो, त्या वेळी त्याच्या श्रावकांचा शिंकेचा किंवा खोकल्याचा देखील शब्द ऐकूं येत नसतो. लोक मोठया आदराने त्याचा धर्म ऐकण्यास तत्पर असतात.....

भगवान - हे उदायि, माझे श्रावक माझ्याशीं आदराने वागतात, व माझ्या आश्रयाखाली राहतात, याला कोणतीं कारणे असावीत असे तुला वाटते?

उदायि - याला पांच कारणें असावीत असें मी समजतो. तीं कोणती? (१) भगवान अल्पाहार करणारा असून अल्पाहाराचे गुण वर्णितो. (२) तो कशाही प्रकारच्या चीवरांनी संतुष्ट असतो, व तशा संतुष्टीचे गुण वर्णितो; (३) जी भिक्षा मिळेल तिच्याने संतुष्ट असतो, आणि तशा संतोषाचे गुण वर्णितो; (४) राहण्याला मिळालेल्या जागेत संतुष्ट असतो, आणि तशा संतुष्टीचे गुण वर्णितो; (५) एकांतात राहतो, आणि एकांताचे गुण वर्णितो. ह्या पाच कारणांनी भगवंताचे श्रावक भगवंताचा मान ठेवतात, आणि त्याच्या आश्रयाखाली राहतात, असें मला वाटतें.

भगवान-श्रमण गोतम अल्पाहारी असून अल्पाहाराचे गुण वर्णितो, एवढयाचसाठी जर, हे उदायि, श्रावक माझा मान ठेवून माझ्या श्रावकांत माझ्याही पेक्षा अत्यंत अल्पाहार करणारे जे श्रावक आहेत, त्यांनी माझा मान ठेवला नसता, आणि ते माझ्या आश्रयाखाली राहिले नसते.

मिळेल त्या चीवराने श्रमण गोतम संतुष्ट राहत असून तशा संतुष्टीचे गुण वर्णितो, एवढयाचसाठी जर, उदायि, माझे श्रावक माझा भान ठेवून माझ्या आश्रयांने राहिले असते, तर माझ्या श्रावकांत जे स्मशानांतून, कचर्‍याच्या राशीतून किंवा बाजारांतून चिंध्या गोळा करून त्यांची चीवरें करतात आणि वापरतात, त्यांनी माझा मान ठेवला नसता, व ते माझ्या आश्रयाने राहिले नसते. कारण मी कधी कधी गृहस्थांनी दिलेल्या वस्त्रांची देखील चीवरें धारण करतों.

श्रमण गोतम मिळालेल्या भिक्षेने संतुष्ट असतो आणि तशा संतोषाचे गुण वर्णितो, एवढयाचसाठी जर माझे श्रावक माझा मान ठेवून माझ्या आश्रयाखाली राहिले असते, तर त्यांत जे केवळ भिक्षेवरच अवलंबून राहतात, लहान मोठे घर वर्ज्य न करता भिक्षा घेतात आणि त्या भिक्षेवर निर्वाह करतात, ते माझा मान ठेवून माझ्या आश्रयाने राहिले नसते. कारण, मी कधीकधी गृहस्थांचे आमंत्रण स्वीकारून चांगले अन्न खातों.
« PreviousChapter ListNext »