Bookstruck

दिनचर्या 10

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »
एके समयी भगवान इच्छानंगल गावाजवळ इच्छानंगल वनांत राहत होता. तेथे भगवान भिक्षूंना म्हणाला,''भिक्षुहो, मी तीन महिनेपर्यंत एकान्तांत राहूं इच्छितों. माझ्याजवळ एका तेवढया पिण्डपात आणणार्‍या भिक्षूशिवाय दुसर्‍या कोणी येऊं नये.'' त्या तीन महिन्यानतंर भगवान एकान्तातून बाहेर आला आणि भिक्षूंना म्हणाला,''जर अन्य संप्रदायांचे परिव्राजक तुम्हांला विचारतील की, ह्या वर्षाकाळांत भगवान कोणती ध्यानसमाधि करीत होता? तर त्यांना म्हणा, भगवान आनापानस्मृतिसमाधि* करून राहिला.''

वरच्या सुत्तांत देखील भगवान पंधरा दिवस आनापानस्मितिसमाधि करीत होत असें म्हटले आहें. याचा अर्थ एवढाच की, त्या समाधीचें महत्त्व लोकांना समजून यावें. पंधरा दिवस किंवा तीन महिने देखील तिची भावना केली, तरी कंटाळा येत नाही आणि तिच्यामुळे शरीरस्वास्थ राहतें.

दुसर्‍या एका प्रसंगी भगवान भिक्षुसंघ सोडून एकटाच पारिलेय्यक वनांत जाऊन राहिल्याचा उल्लेख सहाव्या प्रकरणांत (पूर्वाध पृ. १६५) आलाच आहे. यावरून असें दिसतें की, भगवान कधी कधी जेथे आपणास कोणी ओळखत नसे, अशा ठिकाणीं एकान्तात जाऊन राही. पण जेव्हा त्याची सर्वत्र प्रसिध्दि झाली आणि सर्व लोक त्याला ओळखूं लागले, तेव्हा संघात असतानाच काही काळ संघापासून अलिप्त राहण्याचा उपक्रम त्याने सुरू केला असावा. परंतु त्याच्या पंचेचाळीस वर्षांच्या कारकीर्दीत असे प्रसंग फार नसावेत.
---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
*आन म्हणजे आश्वास व अपान म्हणजे प्रश्वास. त्यांच्यावर साधणार्‍या समाधीला आनापानस्मृतिसमाधि म्हणतात. तिचे विधान समाधिमार्गांत आलेंच आहे.
---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
एकान्तात जाऊन राही. पण जेव्हा त्याची सर्वत्र प्रसिध्दि झाली आणि सर्व लोक त्याला ओळखूं लागले, तेव्हा संघात असतानाच काही काळ संघापासून अलिप्त राहण्याचा उपक्रम त्याने सुरू केला असावा. परंतु त्याच्या पंचेचाळीस वर्षांच्या कारकीर्दीत असे प्रसंग फार नसावेत.

आजकाल कायाकल्पाची बरीच ख्याति झाली आहे. महिना दीड महिना माणसाला एका कोठडीत कोंडून आणि पथ्यावर ठेवून औषधोपचार करण्यांत येतो. त्या योगें मनुष्य पुन्हा तरूण होतो अशी समजूत आहे. या कायाकल्पाचा आणि भगवंताच्या एकांन्तवासाचा संबंध नाही. कां की, भगवान त्या अवधींत औषधोपचार करीत नसे; केवळ आनापानस्मृतिसमाधीची भावना करी.

एकान्तांत पुष्कळ काळ राहण्याची प्रथा सिंहलद्वीपांत, ब्रह्मदेशात किंवा सयामांत क्वचितच आढळते; पण तिबेटांत मात्र ती चालू आहे. एवढेंच नव्हे, तर कांही ठिकाणी तिचा अतिरेक झाल्याचें दिसून येतें. कांही तिबेटी लामा वर्षांचीं वर्षे एखाद्या गुहेंत किंवा अशाच दुसर्‍या ठिकाणी आपणाला कोंडून घेतात आणि सर्व सिध्दि मिळविण्याचा प्रयत्न करतात.
« PreviousChapter ListNext »