Bookstruck

*परिशिष्ट 15

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »
पुनरपि, भिक्षुहो, भिक्षु असा विचार करतो की, सध्या सुभिक्ष आहे, भिक्षा सहज मिळते, भिक्षेवर निर्वाह करणें सोपें आहे. पण असा एक काळ येतो की, दुर्भिक्ष होतें, धान्य पिकत नाही, भिक्षा मिळणें कठीण जातें, भिक्षेवर निर्वाह करणें सोपें नसतें. अशा दुर्भिक्षात लोक जिकडे सुभिक्ष असेल तिकडे जातात. तेथे गर्दी होते. तशा ठिकाणीं बुध्दाच्या धर्माचें मनन सुकर नाही, अरण्यांत एकान्तवासात राहणें सुकर नाही. ती अनिष्ट अप्रिय परिस्थिति प्राप्त होण्यापूर्वीच ...प्रयत्न केलेला बरा! जेणेकरून मी दुर्भिक्षात देखील सुखाने राहूं शकेन. हें तिसरें अनागत भय पाहणार्‍या भिक्षूला ...मन लावून वागायला लावण्यास पुरे आहे.

पुनरपि, भिक्षुहो, भिक्षु असा विचार करतो की, आजला लोक मुदित मनाने न भांडता दूध आणि पाणी यांच्याप्रमाणे सख्याने परस्परांविषयी प्रेमदृष्टि ठेवून वागतात. पण असा एक काळ येतो की, एखादें भीतिप्रद बंड उपस्थित होतें. लोक चीजवस्तू घेऊन यानाने किंवा पायीं इकडे तिकडे पळत सुटतात. अशा संकट समयीं लोक जेथे सुरक्षित स्थान मिळेल, तेथे गोळा होतात, तेथे गर्दी होते. तशा ठिकाणीं बुध्दाच्या धर्माचे मनन सुकर नाही, अरण्यांत एकांतवासांत राहणे सुकर नाही. ती अनिष्ट अप्रिय परिस्थिति प्राप्त होण्यापूर्वीच.... प्रयत्न केलेला बरा! जेणेंकरून तशा संकटांत देखील मी सुखाने राहूं शकेन. हे चवथें अनागतभय पाहणार्‍या भिक्षूला...मन लावून वागायला लावण्यास पुरे आहे.

पुनरपि, भिक्षुहो, भिक्षु असा विचार करतो की, आजला संघ समग्र, संमुदित, भांडण्यावाचून एका ध्येयाने चालत आहे. पण असा एक काळ येतो की, संघात फूट पडते. संघात फूट पडली, तर बुध्दाच्या धर्माचें मनन सुकर नाही, अरण्यांत एकांतवासात राहणें सुकर नाही. ती अनिष्ट अप्रिय परिस्थिति प्राप्त होण्यापूर्वीच ....प्रयत्न केलेला बरा! जेणेंकरून त्या प्रतिकूल परिस्थितींत देखील मी सुखाने राहूं शकेन. हें पाचवे अनागतभय पाहणार्‍या भिक्षूला ...मन लावून वागायला लावण्यास पुरे आहे.

भिक्षुहो, हीं पांच अनागतभयें पाहणार्‍या भिक्षुला, अप्राप्त पदाच्या प्राप्तीसाठी, जें जाणलें नाही ते जाणण्यांसाठी, ज्याचा साक्षात्कार झाला नाही त्याच्या साक्षात्कारासाठी अप्रमत्तपणे उद्यमशीलतेने आणि मन लावून वागायला लावण्यास पुरे आहेत.

मुनिगाथा

हें मुनिसुत्त या नांवाने सुत्तनिपातांत सापडतें. त्यांचे भाषांतर येणेंप्रमाणे -

स्नेहामुळे भय उत्पन्न होतें व घरापासून मळ उद्भवतो; यास्तव अनागारिकता आणि नि:स्नेहता हेंच मुनीचें तत्वज्ञान समजावे. १

जो उद्भवलेल्या मनोदोषाचा उच्छेद करून त्याला पुन: वाढू देत नाही व त्याविषयी स्नेह बाळगीत नाही, त्या एकाकी राहणार्‍याला मुनि म्हणतात. त्या महर्षीने शान्तिपद पाहिलें.

पदार्थ व त्यांचीं बीजें जाणून* जो त्यांना स्नेह (ओलावा) देत नाही, तो खरोखर जन्मक्षयान्तदर्शी मुनि होय. तो तर्क सोडून देऊन नामाभिधान (जन्म) पावत नाही.३
« PreviousChapter ListNext »