Bookstruck

तपश्चर्या व तत्वबोध 9

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »
१७.  कित्येक श्रमण-ब्राह्मण तुझ्या सेनेंत मिसळून गेल्यामुळे प्रकाशत नाहीत, आणि ज्या मार्गाने साधुपुरुष जातात तो मार्ग त्यांना माहीत नाही.

१८.  चारी बाजूंना मारसेना दिसते, आणि मार आपल्या वाहनासह सज्ज झाला आहे.  त्याच्याबरोबर युद्ध करण्यासाठी मी पुढे सरसावतों.  कां की, त्याने मला स्थानभ्रष्ट करूं नये.

१९.  देव आणि मनुष्य तुझ्या सेनेपुढे उभे राहूं शकत नाहीत.  त्या तुझ्या सेनेचा, दगडाने मातीचें भांडें फोडून टाकावें त्याप्रमाणे, मी माझ्या प्रज्ञेने पराभव करून टाकतों.

२०.  संकल्प ताब्यांत ठेवून आणि स्मृति जागृत करून अनेक श्रावकांना उपदेश करीत मी देशोदेशीं संचार करीन.

२१.  ते (श्रावक) माझ्या उपदेशाप्रमाणे सावधपणें चालून आणि आपल्या ध्येयावर चित्त ठेवून तुच्या इच्छेविरुद्ध अशा पदाला जातील की, जेथे शोक करण्याचा प्रसंग येत नाही.

२२.  (मार म्हणाला,) सात वर्षेपर्यंत भगवंताच्या मागोमाग हिंडलों; परंतु स्मृतिमान् बुद्धाचें कांहीच वर्म सापडलें नाही.

२३.  येथे कांही मऊ पदार्थ सापडेल, कांही गोड पदार्थ मिळेल, अशा आशेने कावळा मेदवर्ण पाषाणाजवळ आला.

२४.  परंतु त्यांत लाभ न दिसून आल्यामुळे कावळा तेथून निघून गेला.  त्या कावळ्याप्रमाणे मी देखील गोतमापासून निवृत्त होऊन निघून जातों !

२५.  याप्रमाणें शोक करीत असतां माराच्या काखेंतून वीणा खाली पडला; आणि तो दुःखी मार तेथेच अंतर्धान पावला.

या सुत्ताचें भाषांतर ललितविस्तराच्या अठराव्या अध्यायांत आलें आहे.  त्यावरून याचेयं प्राचीनत्व सिद्ध होतें.  वर दिलेला भयभेरवसुत्तांतील मजकूर वाचला असतां या साध्या रूपकाचा अर्थ सहज लक्षांत येतो.  मनुष्यजातीच्या कल्याणाला कोणी पुढे सरसावला असतां त्यावर पहिल्याने हल्ला करणारी मारसेना म्हटली म्हणजे कामोपभोगांची वासना होय.  तिला दाबून पुढे पाऊन टाकतो न टाकतो, तों (अरति) असंतोष उत्पन्न होतो.  त्यानंतर भूक, तहान वगैरे एकामागून एक उपस्थित होतात आणि त्या सर्व वासनांवर व विकारांवर जय मिळविल्याशिवाय कल्याणप्रद तत्त्वाचा साक्षात्कार होणें कधीही शक्य नाही.  तेव्हा बुद्धाने माराचा पराभव केला म्हणजे अशा मनोवृत्तींवर जय मिळविला असें समजावें.
« PreviousChapter ListNext »