Bookstruck

विभाग पहिला - वैदिक संस्कृति 2

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »
५. ऋग्वेद वाचीत आसतांना मला अशी शंका आली कीं, त्यांतील कांहीं गोष्टींचा बाबिलोनियन संस्कृतीशीं निकट संबंध असावा. गेल्या ( १९३४ ) वर्षाच्या ऑगस्ट महिन्यांत जेव्हां मी हिंदु युनिव्हर्सिटींत राहण्यास आलों, तेव्हां यासंबंधीं डॉ० प्राणनाथ यांच्याशीं बोललों. सिंध आणि पंजाब प्रांतांत सांपडलेल्या प्राचीन नगरावशेषांतील मुद्रांवरील लिपि वाचण्याचा त्यांचा प्रयत्‍न आज बरींच वर्षें चालू आहे. त्या भाषेचा संबंध ‘ॐ, र्‍हां, र्‍हीं’ इत्यादिक तांत्रिक पारिभाषिक शब्दांशी ते लावीत असत. ह्याच विषयावर त्यांचीं एक दोन व्याख्यानें पुण्यास झालीं, असें मी ऐकलें होतें. पण त्या मुद्रांवरील अक्षरांचा जर कशाशीं संबंध असेल तर तो ऋग्वेदाशीं असावयास पाहिजे असें माझें म्हणणें होतें. कांहीं अंशीं तें त्याना पटलें असावें; व तेव्हांपासून ऋग्वेदाचा आणि बाबिलोनियन वाङ्‌मयाचा संबंध जोडण्याचा त्यांनी प्रयत्‍न चालविला आहे. या विषयावर त्यांचे कांहीं लेख काशी येथील ‘सनातन धर्म’ साप्ताहिकांत प्रसिध्द झाले. पुढें सनातन्यांनी विरोध केल्यामुळें ही लेखमाला त्यांना बंद ठेवावी लागली. त्यांचें म्हणणें असें दिसतें कीं, ऋग्वेदांतील पुष्कळशा ऋचा बाबिलोनियन ऋचांशीं जुळतात, इतकेंच नव्हे तर ‘सृण्येव जर्भरी तुर्फरीतू’ ऋ० १०।१०६।६ इत्यादिक ऋचांचा सायणादिकांना जो अर्थ मुळींच समजला नाहीं, तो बाबिलोनियन ऋचांवरून स्पष्ट होतो. बाबिलोनियन भाषांचें मला मुळींच ज्ञान नसल्यामुळें या विषयावर साधक बाधक मत देणें धाष्टर्याचें होईल. तथापि बाबिलोनियन आणि वैदिक संस्कृतीचा अत्यन्त निकट संबंध आहे याविषयीं मात्र माझी खात्री होत चालली आहे.

६. परलोकवासी लो० टिळक यांनी ‘Sir R .G. Bhandarkar Commemoration Volume’ मध्यें १९१७ सालीं ‘The Chaldean  and Indian Vedas’ या नांवाचा लेख लिहिला आहे. काशी विद्यापीठाचे अध्यापक पं० रुद्रदेव शास्त्री यानीं हा लेख नुकताच माझ्या निदर्शनास आणून दिला. त्याचा विचार योग्य स्थळीं करण्यांत येईलच.१
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
(१. वि० १।२०-२३ पहा.)
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
« PreviousChapter ListNext »