Bookstruck

विभाग पहिला - वैदिक संस्कृति 9

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »
३३. त्यानंतर युधिष्ठिर भीष्माला विचारतो कीं, अशा बुद्धिमान् आणि विष्णुभक्त वृत्राला इन्द्रानें मारलें कसें ? तेव्हां भीष्म, ‘ महादेव ज्वर होऊन वृत्राच्या अंगांत शिरला व विष्णु इन्द्राच्या वज्रांत शिरला, आणि त्यामुळें वृत्राचा वध करतां आला ’, इत्यादि कथा सांगतो. पुढें जेव्हां वृत्राचा वध करण्यांत आला, तेव्हां वृत्राच्या शरीरांतून ब्रम्हहत्या निघाली व तिनें इन्द्राला घेरलें, इत्यादि कथा आली आहे.

३४. या कथेला वैदिक वाङ्मयांत आधार सांपडला नसता तर तिची गणना शुद्ध दंतकथेंत करणें योग्य झालें असतें. पण ऐतरेय ब्राम्हणाच्या पसतिसाव्या अध्यायांतील दुसर्‍या खंडांत देवांनी इंद्रावर विश्वरूपाला मारल्याचा, वृत्राला मारल्याचा, यतींना कुत्र्यांना खाऊं घातल्याचा, अरुर्मघांना ठार मारल्याचा व बृहस्पतीवर प्रतिप्रहार केल्याचा असे पांच आरोप ठेवले अशी कथा आहे. तिजवरून वृत्र ब्राम्हण होता असें ठरतें. सुमेरियन लोकांत कधीं कधीं पुजारी लोकांनीच राजसत्ता बळकावल्याचीं उदाहरणें आढळतात, व राजाहि कधीं कधीं देवाचा पुजारी होत असे. म्हणजे ब्राम्हण आणि क्षत्रिय यांची कर्में अत्यन्त भिन्न आहेत अशी समजूत नव्हती. परशुरामाची कथाहि या विधानाला बळकटी आणते. तेव्हां वृत्र हा ब्राम्हण होता असें समजण्यास कोणतीच हरकत नाहीं.

३५. त्या काळच्या निरनिराळ्या लोकांत सूर्योपासना चालू असे. बाबिलोनियांत मर्दुक (Marduk) देवाच्या रूपानें, ऐल आणि पर्शियन देशांत मित्राच्या रूपानें, व सिंध देशांत ती विष्णूच्या रूपानें प्रचारांत होती असें दिसतें. ‘ अथाब्रवीदवृत्रभिन्द्रो हनिष्यन्त्सखे विष्णो वितरं वि क्रमस्व ’ ४।१८।११ येथे सायणाचार्यांनी ‘ विक्रमस्व ’ पदाचा अर्थ ‘ पराक्रम कर ’ असा केला आहे. परन्तु त्याचा ‘दूर हो’ असा अर्थ असणें संभवनीय आहे. आणि तसा तो केला असतां वरील महाभारताच्या कथेशीं या वाक्याचा संबंध जोडतां येईल. वृत्राला मारीत असतां इंद्र विष्णूला म्हणाला, ‘ सखे विष्णो, तूं पूर्णपणें दूर हो.’ म्हणजे तूं तुझ्या भक्ताला वृत्राला मदत करूं नकोस, असा याचा अर्थ होईल, व त्यायोगें महाभारतांतील कथेला बळकटी येईल.

३६. महिन्जो-दारो आणि हरप्पा या दोन ठिकाणीं सांपडलेले नगरावशेष दास लोकांच्या वेळचे असें जर गृहीत धरलें, तर कांहीं बाबतींत दासांची संस्कृति उच्च दर्जाची होती असें म्हणावें लागेल. दास हे सुमेरियनांपैकींच असणेंहि संभवनीय आहे. युफ्रेतिस आणि तैग्रिस नद्यांच्या मुखांजवळ सुमेरियन लोकांनी वसाहती केल्यानंतर कांहीं काळानें त्यांच्यांतील ह्या दास लोकांनी सप्तसिंधु देशांत वसाहती केल्या असाव्यात पण सुमेर देशांत अक्केडियन सेमेटिक लोकांचें महत्त्व वाढल्यावर सुमेरियन वसाहतींचा व दासांच्या वसाहतींचा संबंध तुटला असावा. बाबिलोनियन लोकांना केशी लोक येण्यापूर्वी जसा घोडा माहीत नव्हता तसाच तो आर्य लोक येण्यापूर्वी दासांनाहि माहीत नव्हता असें दिसतें. कां की, महिन्जो-दारो आणि हरप्पा येथें मिळालेल्या मुद्रांवर इतर जनावरांचीं चित्रे सांपडतात, पण घोड्याचें चित्र मुळींच सांपडत नाहीं, तेव्हां दास लोकांच्या पराभवाला जीं अनेक कारणें झालीं, त्यांपैकीं त्यांजकडे घोडदळ नव्हतें हें मुख्य असावें.
« PreviousChapter ListNext »