Bookstruck

विभाग पहिला - वैदिक संस्कृति 14

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »
अन्तरा द्विन्नं अयुज्झपुरानं पञ्चविधा ठपिता अभिरक्खा ।
उरगकरोटि पयस्स च हारी मदनयुता चतुरो च महन्ता ।।


टीकाकारानें या गाथेचा अर्थ असा लावला आहे कीं, देवांचें आणि असुरांचे अशीं दोन अयोध्य नगरें, त्यांच्या दरम्यान इंद्रानें उरग (नाग), करोटि (सुपर्ण), पयस्स हारी (कुंभण्ड = दानव राक्षस), मदनयुत (यक्ष), व चार महन्त म्हणजे चार दिक्पाल रक्षणासाठीं ठेवले.

५७. येथें असा प्रश्न येतो कीं, दोन अयोध्या नगरें कोणतीं ? एक पर्शियाची राजधानी व दुसरी एलामाची राजधानी अशीं हीं दोन अयोध्य (जिंकण्यास कठीण) नगरें होतीं कीं काय ? दरम्यान इंद्रानें पांच ठिकाणीं रक्षक ठेवले. टीकाकाराच्या अर्थाप्रमाणें उरग, करोटि वगैरे निरनिराळे लोक होते. पण पयस्स हारी करोटि नांवाचें नाग आणि मदन म्हणजे मीडियन (Median किंवा Medes) यांचे चार पुढारी मिळून पांच कीं काय ? आजला इंग्रज सरकार ज्याप्रमाणें हिंदुस्थानच्या बचावासाठीं सरहद्दीवरील निरनिराळ्या लोकांशीं सलोख्यानें वागतें, त्याप्रमाणें इंद्रानेंहि आपल्या साम्राज्याच्या बचावासाठीं ह्या लोकांशीं तह केला असावा.

५८. सप्तसिंधूवरील स्वारीचें काम संपल्यावर इंद्र एलाममध्यें जाऊन राहिला असला पाहिजे. त्यानें स्थापलेल्या संस्थानिकांत त्याची पूजा होणें स्वाभाविक होतें. आजकाल जशी पंचम जॉर्ज राजाची जयन्ती सर्वत्र साजरी करण्यांत येते, तशी ती सप्तसिंधु प्रदेशांत इंद्राची साजरी करण्यांत येत होती, यांत संशय बाळगण्याचें कारण नाहीं. रामलीलेंत ज्याप्रमाणें रावणाला व इतर राक्षसांना मारण्याचा तमाशा दर वर्षी दसर्‍याच्या दिवसांत संयुक्त प्रांतांत अनेक ठिकाणीं होत असतो, त्याप्रमाणें इंद्रानें वृत्र आणि त्याचे अनुयायी यांना मारल्याचा तमाशा सप्तसिंधु प्रदेशांत संस्थानिकांतच नव्हे तर सामान्य लोकांतहि होत असावा. ‘क इमं दशभिर्ममेन्द्रं क्रीणाति धेनुभिः । यदा वृत्राणि जङ्घनदथैनं मे पुनर्दवत् ।।’ ऋ० ४।२४।१० (दहा गाई देऊन हा माझा इंद्र कोण विकत घेईल ? वृत्राच्या सैन्याला मारल्यावर या माझ्या इंद्राला त्यानें परत करावें.) या ऋचेवरून असें दिसतें कीं, कारागीर लोक मोठमोठाले इंद्र करून इंद्रलीलेच्या वेळीं भाड्याला देत असत; व ती लीला संपल्यावर पुन्हा त्या इंद्राच्या मूर्ति दुसर्‍या वर्षासाठीं जपून ठेवीत असत.

५९. इंद्राच्या मागोमाग दुसर्‍या तशाच बलाढ्य राजाची स्वारी हिंदुस्थानवर झाली असती, तर या सर्व लीलेचा लोप होऊन तिच्या जागीं नवीन जेत्याची लीला सुरू झाली असती. परंतु इंद्रापासून चंद्रगुप्तापर्यंतच्या काळांत हिंदुस्थानांत दुसरें साम्राज्य स्थापलें गेलें नाहीं, व त्यामुळें इंद्राचें नांव अमर झालें. तरी कांहीं काळानें ब्रम्हणस्पति किंवा बृहस्पति याचा दर्जा वरचा होऊन इंद्राचा दर्जा त्याच्या खालीं आला.
« PreviousChapter ListNext »