Bookstruck

विभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 9

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »
४२. “अशा संपत्तीचा उपभोग घेत असतां माझ्या मनांत असा विचार आला कीं, अविद्वान् सामान्य जन स्वत: जरेच्या तडाक्यांत सांपडणारा असून, जराग्रस्त म्हातार्‍या माणसाकडे पाहून कंटाळतो व त्याचा तिरस्कार करतो ! परंतु मी स्वत: जरेच्या तडाक्यांत सांपडणारा असून त्या सामान्य माणसाप्रमाणें जराग्रस्ताला कंटाळलों किंवा त्याचा तिरस्कार केला, तर तें मला शोभणार नाहीं. ह्या विचारानें माझा तारुण्यमद समूळ नाहींसा झाला.

४३. “अविद्वान् सामान्य जन स्वत: व्याधीच्या तडाक्यांत सांपडणारा असून व्याधिग्रस्त माणसाला पाहून कंटाळतो व त्याचा तिरस्कार करतो ! परंतु मी स्वत: व्याधीच्या तडाक्यांतून सुटलों नसतां त्या सामान्य जनाप्रमाणें व्याधिग्रस्ताला कंटाळलों किंवा त्याचा तिरस्कार केला, तर तें मला शोभणार नाहीं. ह्या विचारानें माझा आरोग्यमद समूळ नष्ट झाला.

४४. “अविद्वान् सामान्य जर स्वत: मरणधर्मी असून मृत शरीर पाहून कंटाळतो व त्याचा तिरस्कार करतो ! परंतु मी स्वत: मरणधर्मी असून त्या सामान्य जनाप्रमाणे प्रेताला कंटाळलों किंवा त्याचा तिरस्कार केला, तर तें मला शोभणार नाहीं. ह्या विचारानें माझा जिवितमद समूळ नष्ट झाला.”

४५. ह्या सुत्तावरून असें दिसून येतें कीं, बोधिसत्त्वाच्या मनांत जरा, व्याधि आणि मरण ह्या तीन आपत्तींचे विचार वारंवार येत असत. वृद्ध, व्याधित आणि मृत मनुष्याला पाहून त्यानें गृहत्याग केला, ही जी दंतकथा आहे ती देखील या सुत्तावरून खोटी ठरते. श्रमणाचे मोठमोठाले संघ मगध व कोसल देशांत धर्मसंचार करीत फिरत असतां बोधिसत्त्वाला धार्मिक जीवनाची माहिती नसावी, हें संभवनीय नाहीं.

४६. गृहस्थाश्रमांत असतांना आपणाला वैराग्य कसें झालें हें बुद्ध भगवंतानें सुत्तनिपातांतील अत्तदंड सुत्तांत सांगितलें आहे. भगवान् म्हणतो, “अपुर्‍या पाण्यांत मासे जसे तडफडतात, त्याप्रमाणें परस्पराशीं विरोध करून तडफडणार्‍या जनतेला पाहून माझ्या अन्त:करणांत भय शिरलें ! चारी बाजूंना जग असार वाटूं लागलें. दिशा कांपत आहेत असा भास झाला ! त्यांत आश्रयाची जागा शोधीत असतां मला निर्भय स्थान सांपडेना. शेवटपर्यंत सर्व जनता परस्पराशीं विरुद्ध झालेलीच दिसून आल्यामुळें माझें मन उद्विग्न झालें.”

४७. जरा-व्याधि-मरणाचा विचार बोधिसत्त्वाच्या मनांत वारंवार घोळत होता यांत शंका नाहीं. परन्तु तें त्याच्या वैराग्याचें मुख्य कारण नव्हे. जरा-व्याधि-मरणांनी बद्ध झालेली जनता परस्पराशीं द्वेष करुन एकसारखी भांडत आहे, हें पाहून त्याला अत्यंत वैराग्य आलें. लोकांत व्यवस्था स्थापण्यासाठीं राज्यपद प्राप्त करुन घेतलें तरी विरोधापासून मनुष्य मुक्त होत नाहीं. राजाचे मुलगेच राजाला मारून राज्यपद मिळवूं पहातात ! अर्थात् लहानसहान माणसापासून तहत सर्वाधिकारी राजापर्यंत विरोधापासून कोणीहि मुक्त नाहीं. तेव्हा क्षत्रियांच्या परंपरेंत गोतमाला निर्भय जागा सांपडली नाहीं यांत आश्चर्य कोणतें?

४८. प्रपंचाचा त्याग करुन परिव्राजक होणारे पुष्कळ क्षत्रिय त्या काळीं होते. वर सांगितलेला जैनांचा गुरु नाथपुत्र हा पण एक मोठ्या क्षत्रिय राजाचा ( जमीनदाराचा) मुलगा होता. बोधिसत्त्वाचे पहिले गुरु आडार कालाम व उद्रक रामपुत्र हे देखील क्षत्रियच होते. तेव्हां बोधिसत्त्वानें अशा एकाद्या पंथांत शिरून आपणासाठीं निर्भय स्थान शोधून काढण्याचा निश्चय केला असला पाहिजे.
« PreviousChapter ListNext »