Bookstruck

विभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 16

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »
अशोक व श्रमणसंस्कृति

८४. चन्द्रगुप्त मौर्य जैन संप्रदायी होता, असें जैनाचें म्हणणें आहे, व तें खरेंहि असूं शकेल. परंतु चन्द्रगुप्तानें यज्ञयाग बंद करण्याचा प्रयत्‍न केला नाहीं. स्वत: त्यानें यज्ञयाग केले नाहींत, आणि ब्राह्मणांना ह्या कामीं उत्तेजन दिलें नाहीं. ह्याच कारणास्तव ब्राह्मण ग्रंथकारांनी त्याला शूद्रवंशी ठरविलें असावें. त्याचा मुलगा बिंदुसार हा कोणत्या पंथाचा होता हें समजत नाहीं. तो कोणत्याहि पंथाचा असला, तरी आपल्या राज्याची व्यवस्था करण्यापलीकडे त्यानें विशेष कांहीं केलें असावें असें दिसत नाहीं. त्याचा मुलगा अशोक हा मात्र श्रमणसंस्कृतीचा पूर्ण पुरस्कर्ता बनला.

८५. राज्याभिषेकानंतर आठव्या किंवा नवव्या वर्षीं अशोकांनें कलिंग देशावर स्वारी केली. तेथें एक लाख लोक मारले गेले; व दीड लाख लोकांना धरून आणण्यांत आलें. १. त्यामुळें कलिंग देशांत मोठा हाहा:कार माजून राहिला, व त्याचा अशोकाच्या मनावर विलक्षण परिणाम झाला. तो जितका हिंसक होता, तितकाच अहिंसक बनला. त्या वेळीं जे श्रवणपंथ होते त्यांत त्याला बौद्ध पंथ विशेष आवडला, व तो पूर्णपणें बुद्धाचा भक्त बनला. बुद्धधर्माच्या प्रचारासाठीं त्याचा प्रयत्‍न प्रसिद्धच आहे. परंतु तो कोणत्याहि प्रकारें सांप्रदायिक नव्हता. बौद्ध संप्रदायाला जरी त्यानें सर्वतोपरी मदत केली असली, तरी इतर श्रमणसंप्रदायांचा योगक्षेम नीट चालावा याजबद्दलहि तो खबरदारी घेत असे. एवढेंच नव्हे, तर श्रमणसंप्रदायांनी आपसांत कलह माजवून कालाचा अपव्यय करूं नये, या बद्दल शक्य तेवढा त्यानें बंदोबस्त केला होता.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
( १ अशोकाचा तेरावा शिला लेख पहावा )
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
८६. सातव्या शिलालेखांत तो म्हणतो, “सर्व ठिकाणीं सर्व पाषंड (श्रमणसंप्रदायी) राहोत. कारण ते संयम आणि भावशुद्धि इच्छितात... विपुल दानधर्म करून देखील ज्या माणसाला संयम, भावशुद्धि, कृतज्ञता आणि दृढभक्तिता नाहीं, तो खरोखरच नीच होय.”

८७. हा अशोकाचा उपदेश गृहस्थांसाठीं आहे. जे गृहस्थ आपल्या संप्रदायाला विपुलदान देत, परंतु दुसर्‍या संप्रदायांची निंदा करीत, किंवा त्यांना हाणून पाडण्याचा प्रयत्‍न करीत, त्यांना अशोक म्हणतो कीं, ‘सगळे श्रमणसंप्रदाय संयम आणि अन्त:करणाची शुद्धि इच्छितात. तेव्हां तुम्ही पुष्कळ दानधर्म केला, पण वाचेचा संयम दाखविला नाहीं, तुमचें अन्त:करण शुद्ध झालें नाहीं, तुमच्यामध्यें अशा लोकांविषयीं कृतज्ञता आणि दृढभक्ति उत्पन्न झाली नाहीं, तर तुम्हाला नीचच म्हणावे लागेल.’
« PreviousChapter ListNext »