Bookstruck

विभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 20

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »
१००. या अशोक राजाच्या कृत्यामुळें बौद्ध भिक्षुसंघ परिग्रहवान् बनला. भिक्षूपाशीं स्वत:चीं अशीं, तीन चीवरें व एक भिक्षापात्र एवढीच कायती संपत्ति असे. पण संघासाठीं एकादी रहाण्याची जागा घेण्याची परवानगी बुद्धकालापासूनच होती. त्या जागेची मालकी गृहस्थांची असे, व तिची डागडुजीहि गृहस्थच करती असत. भिक्षुसंघ तेवढा चातुर्मासांत त्या ठिकाणीं रहात असे; आणि बाकी आठ महिने प्रवास करून लोकांना उपदेश करी. जर भिक्षुसंघ चातुर्मासाशिवाय बरेच महिने एकाच ठिकाणी राहिला, तर लोक टीका करीत असत.१ परन्तु ही परिस्थिती अशोककालापासून पूर्णपणें पालटली. मोठमोठाले विहार बनले; व त्यांत भिक्षु कायमची वस्ती करून राहू लागले.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
( १ तेन खो पन समयेन भगवा तत्थेव राजगहे वस्सं वसि, तत्थ हेमन्तं, तत्थ गिम्हं | मनुस्सा उज्झायन्ति... न इमेसं दिसा पक्खायन्तीति । विनयपि. महावग्ग, महाक्खन्धक ).
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
१०१. असन्तं भावनं इच्छेय पुरेक्खारञ्च भिक्खुसु |
आवासेसु च इस्सरियं पूजा परकुलेसु च ||
ममेव कंत मञ्ञन्तु गिही पब्बजिता उभो |
ममेवातिवसा अस्सु किच्चाकिच्चेसु किस्मिचि ||
इति बालस्स सङ्कप्पो इच्छा मानो च वड्ढति |
अञ्ञा हि लाभूपनिसा अञ्ञा निब्बानगामिनी ||
एवमेतं अभिञ्ञाय भिक्खु बुद्धस्स सावको ||
सक्कारं नाभिनन्देय्य विवेक मनुब्रूहये ||
(नसलेली ध्यानसमाधीची भावना मला आहे असें दाखविण्याची, भिक्षूंचा पुढाकार मिळविण्याची, विहारांत अधिकाराची व गृहस्थकुलांत मान्यता मिळवण्याची इच्छा: व गृहस्थ आणि भिक्षु माझ्याच वचनांत राहोत, कोणत्याहि कृत्याकृत्यांत ते मलाच वश असले पाहिजेत, असा मूर्खाचा (भिक्षूचा) संकल्प. त्यामुळें इच्छा आणि मान वाढत जातो. पण लाभाचा रस्ता निराळा आणि निर्वाणाला जाण्याचा रस्ता निराळा, हें बुद्धाच्या भिक्षु श्रावकानें जाणून सत्काराचें अभिनन्दन करूं नये; विवेक वाढवावा.) ह्या धम्मपदांतील गाथा ह्याच काळीं रचल्या असाव्या. उघडच आहे कीं, जेव्हां मोठमोठाले विहार स्थापन झाले तेव्हां त्यांत पुढारीपणाविषयींहि चढाओढ सुरू झाली. सर्व श्रमणपंथांत एकी घडवून आणण्याचा अशोकाचा प्रयत्‍न तर बाजूलाच राहिला. पण खुद्द बुद्धाच्या संघांतहि अशा वासनेमुळें तट पडूं लागले, व भांडणें होऊं लागलीं. तीं मिटवण्याला अशोक राजाला बरीच खटपट करावी लागत असे, असें सारनाथ येथील त्याच्या शिलालेखावरून दिसून येतें.

१०२. विहारांतील भिक्षूंचा चरितार्थ केवळ भिक्षेनें चालणें शक्य नव्हतें. तेव्हां त्यांच्यासाठीं आरामिकांची व्यवस्था करावी लागली. आरामिक म्हणजे आरामाचे (विहाराचे) सेवक. त्यांचा दर्जा जवळ जवळ संयुक्त प्रांतांतील शेतकर्‍यांसारखा होता. त्यांना जमिनीचा महसूल विहाराला द्यावा लागे; व त्याशिवाय वेळोवेळीं आरामाची डागडुजी वगैरे कामें करावीं लागत. या सम्बन्धीं पहिला उल्लेख महावग्गांत सांपडतो.

१०३. “त्यावेळीं आयुष्मान् पिलिंदवच्छ राजगृह येथें लेणें करण्याच्या उद्देशानें डोंगराच्या कड्याखाली डागडुजी करवीत होता. तेव्हां मगधराजा बिंबिसार त्याजपाशीं आला, आणि त्याला अभिवादन करून एक बाजूला बसला व म्हणाला, ‘भदंत येथें काय करवतां?’ पिलिंदवच्छ म्हणाला, ‘महाराज, लेणें करण्याच्या उद्देशानें मी या कड्याची डागडुजी करवीत आहे.’ राजा म्हणाला, ‘तुम्हाला आरामिक पाहिजे काय?’ ‘महाराज, भगवंतानें आरामिक बाळगण्याची अनुज्ञा दिली नाहीं.’ ‘भदंत, असें असेल तर भगवंताला विचारून मला कळवा.’
« PreviousChapter ListNext »