Bookstruck

विभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 24

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »
११८. याप्रमाणें जैन आणि बौद्ध साधूंनी विहार व मन्दिरें यांच्या रुपानें परिग्रहाला सुरुवात केल्यानंतर अशा असत्य गोष्टी रचून राजांना संतुष्ट ठेवण्याचा धंदा चालविला. पण त्या गोष्टींवर भरंवसा ठेऊन दाबले गेलेले आरामिक किंवा भिक्षूंचे सेवक चुप्प राहिनात. तेव्हां राजांकडून त्यांची हिंसा करवणें प्राप्त झालें. म्हणजे अपरिग्रह, सत्य आणि अहिंसा या तिनीहि यामांचा भंग झाला. रहातां राहिला अस्तेय याम. राजानें दाबून टाकल्यावर जो आरामिकांकडून किंवा इतर प्रजेकडून विहारांना आणि मन्दिरांना कर मिळे त्याला अस्तेय कसे म्हणतां येईल ? लोकांकडून जबरदस्तीनें हिरावून घेतलेली ती संपत्ति होय; खुषीनें दिलेलें दान नव्हें.

११९. ब्राह्मण राजांच्या साहाय्याने शेतकर्‍यांकडून जबरदस्तीनें जनावरें आणून यज्ञयागांत त्यांचा वध करीत असत; व त्याचमुळें सामान्य जनता श्रमणसंस्कृतीकडे वळली. परंतु जेव्हां हेच श्रमण संघारामांच्या आणि मन्दिरांच्या रूपानें श्रीमंत बनले, व राजाश्रय घेऊन सामान्य जनतेकडून संघारामांसाठीं व मन्दिरांसाठीं कर वसूल करूं लागले, तेव्हां लोकांना ते अप्रिय झाले ह्यांत नवल कोणतें? केवळ यज्ञयागांत पशुहत्या करणें हीच काय ती हिंसा, पण अशा रीतीनें लोकांकडून जबरदस्तीनें कर वसूल करणें ही हिंसा नव्हे, अशी ह्या श्रमणांची ठाम समजूत झाली असावी ! अशा रीतीनें श्रमण-संस्कृति निर्जीव होत गेली, व तिच्या जागीं उज्वल अशी संस्कृति उपस्थित न झाल्यामुळें पौराणिक संस्कृतीला वाव मिळाला, व ती उदयाला आली.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
समाप्त
« PreviousChapter ListNext »