Bookstruck

विभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 6

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »
२६.  बौद्ध इंद्राचा स्वभाव समजण्याला हीं उदाहरणें पुरेत. जौ वैदिक इंद्र आपल्याच बापाला ठार करतो, शहरांची शहरें उध्वस्त करून टाकतो, ब्राह्मणांना आणि यतींना ठार मारतो, शेंकडो रेड्यांचा फडशा पाडतो, व त्याच्यावर सरोवरांचीं सरोवरें सोमरस गटागट पिऊन टाकतो, त्यालाच बौद्ध श्रमणांनी कसें अहिंसक बनविलें, हें या उदाहरणांवरून स्पष्ट दिसून येईल. ह्या श्रमणांना खोटें ठरवण्याला ब्राह्मणांना मुळींच प्रयास पडले नसते. वेदांतील चार पांच उतार्‍यांनी श्रमणांचा खोटेपणा तेव्हांच सिद्ध करतां आला असता. पण तें ब्राह्मणांनी कां केलें नसावे?

२७.  एक तर ब्राह्मणांमध्येंच इंद्राचें फारसें महत्त्व राहिलें नव्हतें. इंद्राचें साम्राज्य कधींच नामशेष झालें होतें, व जे कोणी बुद्धसमकालीं क्षत्रिय होते त्यांपैकीं कोणत्याहि महाराजाचा कुलदेव इंद्र नव्हता. यज्ञयागांत इंद्राच्या ऋचा म्हणण्यांत येत असत. पण त्यांचा अर्थ फार थोड्यांना समजत असे. अशा समयीं वैदिक इंद्राची तरफदारी करून ब्राह्मणांना कांहीं फायदा नव्हता. दुसरें हें कीं, इंद्र क्रूर होता, हिंसक होता इत्यादिक गोष्टी सिद्ध केल्यानें इंद्राची जी कांहीं थोडी बहुत चहा लोकांत होती, ती देखील नष्ट झाली असती. तेव्हां ब्राह्मणांनी श्रमणांना इंद्राला वाटेल तसा बनवण्याची मुभा दिली. पण त्याचा परिणाम असा झाली कीं, इंद्राविषयी सामान्य जनतेची श्रद्धा मुळींच राहिली नाहीं, आणि पौराणिकांनी त्याला अगदींच खालच्या दर्जाला नेऊन पोंचविलें. ‘तो अहिल्येचा जार, अति व्यभिचार केल्यानें त्याचे वृषण गळून पडले, व देवांनी त्याला बकर्‍याचे वृषण लावले !’ अशा कथा महाभारतांत सांपडतात. १
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
( १ इन्द्रो मुष्कवियोगं मेषवृषणत्वं चावाप || २३ || कुंभकोण, शान्ति प.अ. ३५१. )
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
« PreviousChapter ListNext »