Bookstruck

विभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 13

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »
(४)
५९. “... व्रातांना आणि व्रातपतींना तुम्हाला नमस्कार असो. गणांना आणि गणपतींना तुम्हाला नमस्कार असो. विरूपांना आणि विश्वरूपांना तुम्हाला नमस्कार असो. महंतांना आणि क्षुल्लकांना तुम्हाला नमस्कार असो. रथींना आणि अरथींना तुम्हाला नमस्कार असो. रथांना आणि रथांच्या अधिपतींना तुम्हाला नमस्कार असो. सेनांना आणि सेनाधिपतींना तुम्हाला नमस्कार असो. .... सुतारांना व रथ तयार करणार्‍यांना तुम्हाला नमस्कार असो. कुंभारांना आणि लोहारांना तुम्हाला नमस्कार असो. पुंजिष्टांना आणि निषादांना तुम्हाला नमस्कार असो. बाणा आणि धनुष्यें तयार करणार्‍यांना तुम्हाला नमस्कार असो. शिकार करणार्‍यांना आणि कुत्रे पाळणार्‍यांना तुम्हाला नमस्कार असो. कुत्र्यांना आणि कुत्र्यांच्या अधिपतींना तुम्हाला नमस्कार असो.”

(५)
६०. “भवाला व रुद्राला नमस्कार असो. शर्वाला व पशुपतीला नमस्कार असो. नीलकंठाला आणि श्वेतकंठाला नमस्कार असो. कपर्दीला आणि शिरोमुण्डन केलेल्याला नमस्कार असो..”

(८)
६१. “सोमाला आणि रुद्राला नमस्कार असो. ताम्राला आणि अरुणाला नमस्कार असो.
शंगाला आणि पशुपतीला नमस्कार असो. उग्राला आणि भीमाला नमस्कार असो....”

६२. ऋग्वेदामध्यें ह्यापैकीं कांहीं विशेषणें सांपडतात. परंतु येथे त्यांचा बराच विकास झाला आहे, असें दिसून येतें. येथें रुद्राला चोरांचा, दरोडेखोरांचा आणि व्रातांचा अधिपति म्हटलें आहे. तसाच गणांचा, पुंजिष्टांचा आणि निषादांचा तो अधिपति आहे; कुंभार, लोहार इत्यादिकांचाहि अधिपति आहे. याशिवाय भव, शर्व, पशुपति, नीलकण्ठ इत्यादिक त्याचीं नांवें येथें विशेष सांपडतात. यावरून असें अनुमान करतां येणें शक्य आहे कीं, यजुर्वेदाच्या काळीं अशा नांवांनी सरहद्दीवरील डोंगराळ प्रदेशांतील लोक आपल्या देवतांची पूजा करीत असत. ते झाडांचीहि पूजा करीत. वायव्य सरहद्दीवरील लोक आजला जसे चोर्‍या आणि दरोडे यांनी आपला निर्वाह करतात, तसे ते यजुर्वेदाच्या काळींहि करीत असावेत. त्यांना आटोक्यांत ठेवण्याला मोठें सैन्य बाळगणें ब्राह्मणांना शक्य नव्हतें. तेव्हां त्यांचे जे भव, शर्व इत्यादिक देव होते ते रुद्रच आहेत असें भासवून ह्या टोळ्यांतील लोकांना वळवण्याचा हा प्रयत्‍न असावा. तो कितपत सिद्धीला गेला असेल, हें सांगतां येत नाहीं.

६३. होतां होतां या सगळ्या टोळ्यांच्या देवतांमधून भव आणि शर्व हे दोनच देव अथर्व वेदाच्या काळी पुढें आले असें दिसतें. कदाचित लहान सहान टोळ्यांचा पराभव करून दोन प्रमुख टोळ्यांनी इतरांवर स्वामित्व स्थापन केलें, व त्या दोन टोळ्यांचे हे दोन देव शिल्लक राहिले असावेत. अथर्व वेदाच्या चौथ्या कांडाच्या अठ्ठविसाव्या सूक्तांत त्यांची प्रार्थना सांपडते ती अशी –

भव शर्वो मन्वे वां तस्य वित्तं ययोर्वामिदं प्रदिशि यद्विरोचते |
यावस्येशाथे द्विपदो यौ चतुष्पदस्तौ नो मुञ्चतमहंस: ||

( हे भव आणि शर्व हो ! सर्व दिशांत जे तुम्ही प्रकाशत अहां, तें तुमचें सामर्थ्य होय. जे तुम्ही द्विपदांवर आणि चतुष्पदांवर स्वामित्व बाळगतां, ते तुम्ही आम्हाला पापापासून मुक्त करा.)

६४. पुन्हा अकराव्या कांडाच्या दुसर्‍या सूक्तांत प्रार्थना आहे ती अशी –
भव शर्वो मृडतं माभि यांत भूतपती पशुपती नमो वाम् |
प्रतिहितामा यतां मा वि स्त्राष्टं मा नो हिं सिष्टं द्विपदो मा चतुष्पद:||

(हे भव आणि शर्व हो ! आमचें रक्षण करा. आमच्या जवळ येऊं नका. भूतपति आणि पशुपति असे जे तुम्ही त्या तुम्हाला नमस्कार असो. धनुष्याला लावलेला बाण आमच्यावर सोडूं नका. आम्हाला, आमच्या द्विपदांना आणि चतुष्पादांना मारूं नका. )
« PreviousChapter ListNext »