Bookstruck

विभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 30

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »
१४०. आदिपर्वाच्या पहिल्याच अध्यायांत व्यास म्हणतो –

अष्टौ श्लोकसहस्त्राणि अष्टौ श्लोकशतानि च |
अहं वेद्मि शुको वेत्ति संजयो वेत्ति वा न वा ||८१||

(आठ हजार आणि आठशें श्लोक मी जाणतों, व शुक जाणतो; पण संजय जाणतो किंवा जाणतहि नाहीं. ) म्हणजे महाभारताचे मूळ श्लोक आठ हजार आठशें होते, व ते देखील संजयाला माहीत नव्हते. तेव्हां लहानशा बीजापासून जसा मोठा वृक्ष होतो, तसे हें महाभारत थोड्याशा श्लोकांपासून एक लाख श्लोकांचें झालें. ह्यांत मूळचे श्लोक कोणते व प्रक्षिप्त कोणते हें शोधून काढणें कोणालाहि शक्य नाहीं.

१४१. मूळची गोष्ट अगदीं बेताची असली, तरी त्यांत भर पडण्यास गुप्त राजांच्या वेळीं सुरुवात झाली. त्यांना शकांशीं सामना करावयाचा होता; व त्यासाठीं लोकांमध्यें युद्धप्रेम उत्पन्न करण्याकरतां त्यांनी हें महाभारत पुढें आणलें असावें. त्यांची कृपादृष्टि झाल्याबरोबर ह्या ग्रंथांत वाटेल त्यानें वाटेल ती भर घालण्यास सुरुवात केली; आणि हें काम एकसारखें तेराव्या शतकापर्यंत चालू राहिलें, हे वरील विवेचनावरून समजून येईलच.

१४२. ह्यांत अशा कांहीं विलक्षण गोष्टी खचून भरल्या आहेत कीं, त्यांच्यावर आमच्या पूर्वजांनी विश्वास कसा ठेवला याचें राहून राहून आश्चर्य वाटतें! प्रथमत: लेखकांनी हें जाळें सामान्य जनतेसाठीं विणलें असावें. पण मागाहून त्यांचेच वंशज कोळ्याप्रमाणें ह्या जाळ्यांत गुरफटले गेले. अशा चमत्कारिक गोष्टींचीं एक दोन उदाहरणें येथें देणें योग्य वाटतें.

१४३. “व्यासानें गांधारीला ‘शंभर पुत्र होवोत’ असा वर दिला. गांधारी गरोदर झाली; पण दोन वर्षें मूल होईना. इतक्यांत कुंतीला पुत्र झाल्याचें वर्तमान आलें. हें ऐकून गांधारीनें आपलें पोट बडविलें. त्यामुळें तिच्या पोटांतून मांसाचा गोळा निघाला. तें जाणून व्यास ताबडतोब तेथें आला; व त्यानें तुपानें शंभर घडे भरावयास लावून ते सुरक्षित स्थळीं ठेवविले, व तो गोळा थंड पाण्यानें धुवावयास लावला. तो धुतला जात असतांच त्याचे बोटांच्या पेरांएवढ्या आकाराचे एकशें एक तुकडे झाले. ते तुकडे त्या तुपाच्या घड्यांमध्यें घालून ठेवावयास लावून व्यास चालता झाला. त्यांतून प्रथम दुर्योधन निघाला.... त्यानंतर बाकीचे पुत्र निघून शंभरांची भरती झाली; व एका महिन्यानंतर एक कन्या निघाली.” (आदिपर्व, अ० ११५). १  ही कथा इतकी असंभवनीय आहे कीं, तिच्यावर कोणाचाहि विश्वास बसणें शक्य दिसत नाहीं. तथापि पांच पन्नास वर्षांमागें आमच्यामध्यें ती कथा ऐतिहासिक समजणारे पुष्कळ लोक होते; व आजला देखील खेड्यापाड्यांतून पुष्कळ सांपडतील.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
१ औंध संस्करण; कुंभकोण अ० १२९.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
१४४. दुसरी एक कथा म्हटली म्हणजे खांडव वन जाळण्याची होय.२  “अग्नि ब्राह्मणवेषानें येऊन कृष्णार्जुनापाशीं आपल्या तृप्तीसाठीं कांहीं मागूं लागला. त्यांनी त्याला ‘कोँणतें अन्न हवें’ असें विचारलें. तो म्हणाला, ‘मला अन्न नको. पण हें खांडव वन खावयास पाहिजे. इंद्र त्याचें रक्षण करतो, म्हणून तें मी खाऊं शकत नाहीं. मी पेट घेतल्याबरोबर इंद्र त्यावर पावसाचा वर्षाव करतो.’
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
२ आदिपर्व, औंध सं०अ० २२५ – २३० कुंभकोण, अ० २४९-२५४.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
« PreviousChapter ListNext »