Bookstruck

विभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 46

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »
२०७. परन्तु महायान ग्रंथकारांना चालू भाषेविषयीं पूर्ण तिटकारा असल्याचें दिसून येतें. उघडच आहे कीं, त्यांना लोककल्याणापेक्षां आपल्या संघारामांची विशेष काळजी होती; व संघारामांचें सर्व सुखस्वास्थ्य अधिकारी वरिष्ठ वर्गावर अवलंबून होतें. अर्थात् त्या वर्गाला आवडणार्‍या उच्च भाषेंतून ग्रंथरचना करणें हें त्यांचें कर्तव्य ठरलें. आजकाल ज्याला राजाश्रय पाहिजे असेल, तो इंग्लिशभाषाभिज्ञ गृहस्थ देशी भाषेंत ग्रंथरचना करील काय?

२०८. श्रीहर्षाच्या पूर्वी म्हणजे गुप्त राजांच्या काळीं व श्रीहर्षानंतर आठव्या शतकाच्या समाप्तीपर्यंत बौद्ध श्रमणांनी पुष्कळ वाङ्मय निर्माण केलें. वसुबंधूचा अभिधर्मकोष, दिङ्नागाचा प्रमाणसमुच्चय, शान्तिदेवाचा बोधिचर्यावतार, शान्तरक्षिताचा तत्त्वसंग्रह अशा प्रकारचे उत्तमोत्तम बौद्ध संस्कृत ग्रंथ या कालांत निर्माण झाले. या काळचें पुष्कळसें बौद्ध वाङ्मय ह्या देशांतून नष्ट झालें. पण त्याचीं भाषांतरें तिबेटी आणि चिनी भाषेंत उपलब्ध आहेत. आणि कधींना कधीं तिबेट व चीन देशांतील मोठमोठाल्या विहारांतून मूळ संस्कृत ग्रंथहि सांपडतील, अशी आशा बाळगण्यास जागा आहे. त्यांचा इतिहासाच्या कामीं फार उपयोग होईल. पण त्यामुळें भिक्षूंनी सामान्य जनतेच्या हितचा मार्ग सोडून वरिष्ठ वर्गाची मर्जी संपादण्याचा मार्ग स्वीकारला, ह्या विधानाला बाध येईल असें वाटत नाहीं.

२०९. शशांकानें चालविलेल्या हल्ल्यानें मगध देशांतूनच नव्हे तर हिंदुस्थानांतील पुष्कळशा प्रांतांतून बौद्ध धर्म नष्टप्राय होण्याचीच पाळी आली होती. परंतु सुदैवानें श्रीहर्ष राज्यावर आला, आणि त्यानें बौद्ध धर्माची मालवणारी ही जोत आणखी कांहीं काळ पेटत ठेवली. त्याच्या मरणानंतर नालंदा व इतर ठिकाणच्या संघारामांची स्थिति कशी पालटत गेली हें समजण्याला कांहीं मार्ग नाहीं. पण आठव्या शतकांत हिंदुस्थानांत आलेल्या इत्सिंग या चिनी यात्रेकरूच्या प्रवासवृत्तावरून असें दिसून येतं कीं, ह्या ज्योतीचा प्रकाश हळू हळू कमी पडत चालला होता व ती मालवण्याच्या पंथाला लागली होती.
« PreviousChapter ListNext »