Bookstruck

विभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 56

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »
भिक्षु – (कानावर हात ठेऊन) बुद्ध, बुद्ध! अहो काय ही दारुण धर्मचर्या?

क्षपणक – अर्हंत, अर्हंत! अरेरे, घोर पाप करणार्‍या कोणी तरी मनुष्यानें याला ठकविलें असावें !

२४१. कापालिक – (रागानें) हा पाप्या, नीच पाखंड्या, मुंडका, केशलुंचका! आम्हाला जर कोणी ठकवणारा असेल, तर तो चतुर्दश भुवनांची उत्पत्ति, स्थिती आणि प्रलय करणारा, वेदान्तप्रसिद्ध ज्याचें सिद्धान्तवैभव आहे, असा भगवान् पार्वतीपति होय. तर मग त्याच्या धर्माचा महिमा तुला दाखवतों.....

क्षपणक - अरे कापालिका, याचसाठीं मी म्हणतों कीं, कोणी इंद्रजालविद्या जाणणार्‍यानें माया दाखवून तुला ठकविलें आहे.

कापालिक - हा पाप्या!  परमेश्वराला इंद्रजालविद्या दाखवणारा म्हणतोस काय? हा याचा दुष्टपणा क्षम्य नाहीं. (तलवार बाहेर काढतो.) दणदण डमरु वाजवून व भूतगणाला एकत्र करून, ह्या तलवारीनें याचें डोकें कापल्यावर कंठनाळांतून उसळणार्‍या फेनिल रक्ताच्या धारांनी त्या भूतगणासह पार्वतीची पूजा करतों! (असें म्हणून तलवार उगारतो.)

क्षणपक - (भयानें) महाभागा, अहिंसा परमधर्म आहे! ( भिक्षूच्या कुशींत शिरतो.)

भिक्षु – (कापालिकाला निवारून) भो भो महाभाग!  केवळ थट्टेच्या भाषणानें रागावून या गरीबावर प्रहार करणें योग्य नाहीं. ( कापालिक तलवार म्यानांत घालतो. )
२४२. क्षपणक – ( जरा ताळ्यावर येऊन) जर महाभागाचा भयंकर राग आवरला गेला असेल, तर मी कांहीं विचारूं इच्छितों.

कापालिक – विचार.
क्षपणक – तुमचा परमधर्म आम्ही ऐकला. आतां सोक्षमोक्ष कोणता तें सांगा.

कापालिक – तर मग ऐक. मृडानीपति म्हणतो कीं, ‘विषयांवांचून जगांत कोठेंहि सुख नाहीं. विषयानन्दविरहित जी जिवाची स्थिती तीच जर मुक्ति, तर तिला पाषाणावस्था म्हटलें पाहिजे!  तिची  इच्छा कां करावी? चन्द्रचूडशरीरी मुक्त जीव पार्वतीसमान दयितेला आलिंगून सानन्द क्रीडा करतो.’

भिक्षु - महाभागा, अवीतरागाला मुक्ति मिळते, याच्यावर श्रद्धा ठेवतां येत नाहीं.

क्षपणक – अरे कापालिका, जर रागवणार नाहींस तर सांगतो. सशरीरी आणि सरागी अशी मुक्ति शक्यच नाहीं.

कापालिक – (आपणाशींच) हां, अश्रद्धेमुळें यांचीं मनें अस्थिर झालीं आहेत. असूं द्या. (उघड) श्रद्धे जरा इकडे ये.

२४३. ( त्यानंतर कापालिकवेष धारण करणारी श्रद्धा प्रवेश करते. )
« PreviousChapter ListNext »