Bookstruck

विभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 58

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »
श्रद्धा - जशी आपली आज्ञा. (असें म्हणून सुरापात्र तोंडाला लावते व थोडी दारू पिऊन भिक्षूला देते.)

भिक्षु - हा महाप्रसादच म्हटला पाहिजे. (असें म्हणून पात्र घेऊन दारू पितो.) काय या दारूचें सौंदर्य ! वेश्यांबरोबर पुष्कळदां मी दारू प्यालों आहें. परंतु मला असें वाटतें कीं, या कापालिनीच्या उष्ट्याची दारू न मिळाल्यामुळेंच देवगण अमृताची लालसा धरतात!

क्षपणक – रे भिक्षु, सगळी दारू पिऊ नकोस. कापालिनीच्या उष्ट्याची मलाहि थोडी ठेवून दे.

२४६. (भिक्षु तें पात्र क्षपणकाला देतो व क्षपणक दारू पितो.)

क्षपणक – अहाहा! काय हा दारूचा मधुरपणा!  काय हा स्वाद!  काय हा सुगंध ! आणि काय ही रुचि! अरिहंतांच्या शासनांत पहून अशा तर्‍हेच्या दारूला मी चिरकाळ मुकलों. रे भिक्षु, मला भोंवळ येते, म्हणून मी निजतों.

भिक्षु - आतां हेंच करूंया ( असें म्हणून दोघेहि निजतात.)

कापालिक - प्रिये पैशांवांचून हे दोन दास आम्हाला मिळाले; तेव्हां आतां नाचूंया. ( असें म्हणून कापालिक व कपालिनी नृत्य करतात.)

क्षपणक - अरे भिक्षु, हा कापालिक किंवा आमचा आचार्य कापालिनीबरोबर सुंदर नृत्य करतो; तर त्यांच्याबरोबर आम्ही पण नाचूंया. ( ते दोघेहि दारूच्या धुंदींत वेडेवांकडे नाचतात.)

२४७. हें नाटक कृष्णमिश्र नांवाच्या दंडी परिव्राजकानें चंडेल राजा कीर्तिवर्मा यांच्या कारकीर्दीत लिहिलें.  इ.स. १०६५ सालीं त्याचा प्रयोग ह्या राजासमोर करून दाखविण्यांत आला होता असें म्हणतात. वर दिलेलें बौद्ध, जैन व कापालिक यांचें वर्णन जरा विशेष खुलवून लिहिलें असावें. तथापि त्यांत बराच ऐतिहासिक तथ्यांश असला पाहिजे. आणि म्हणूनच आम्ही त्याचें रूपांतर येथें दिलें आहे. शैव कापालिकांनी तलवार, स्त्री आणि दारू या तीन साधनांचा उपयोग करून बौद्ध व जैन श्रमणांना आपल्या पंथांत येणें भाग पाडलें; आणि जेथें हें शक्य नव्हतें तेथें त्यांचा उच्छेद केला असावा.
« PreviousChapter ListNext »