Bookstruck

विभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 61

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »
मुसलमानी कारकीर्द

२५५. महंमद इब्न कासीम या अरब सरदारानें इ.स. ७१२ सालीं सिंधवर स्वारी केली, व तो सर्व देश आपल्या ताब्यांत घेतला. तेव्हांपासून सिंध देशावर मुसलमानांचें स्वामित्व अबाधित होतें. शंकराचार्यांचा जन्म इ.स. ७८८ सालीं झाला; आणि त्यांच्या दिग्विजयाला आरंभ त्यानंतर कमींत कमी पंचवीस तीस वर्षांनी झाला असला पाहिजे. म्हणजे त्या काळापर्यंत जवळ जवळ शंभर वर्षें मुसलमान हिंदुस्थानांत येऊन स्थायी झाले होते. असें असतां ह्या नवीन उपस्थित झालेल्या परिस्थितीचा विचार न करतां शैव संन्यासी, पुराणकार ब्राह्मण व वेदांती शंकराचार्य या सर्वांचा बौद्ध आणि जैन यांना उखडून काढण्याचा तेवढा प्रयत्‍न दिसतो !

२५६. एकीकडे अत्यंत भिन्न संस्कृतीचे मुसलमान येऊन आपलें वर्चस्व स्थापन करतात, व दुसरीकडे ब्राह्मण पुराणकार व ब्राह्मण वेदांती बुद्धासंबंधानें लोकांत गैरसमज व द्वेष फैलावून बौद्धांची व जैनांची शिकार करण्याला शैव राजांना व कापालिकांसारख्या शैव संन्याशांना उत्तेजन देतात, हें आश्चर्य नव्हे काय? खरें म्हटलें असतां अशा प्रसंगीं पार्श्वानें व बुद्धानें घालून दिलेल्या अहिंसेच्या पायावर हिंदी संस्कृतीची पुनर्घटना करून मुसलमानांच्या अत्याचारांना तोंड देणें वाजवी होतें. पण तसें केलें असतां शिवाची किंवा शिवलिंगाची पूजा करून ब्राह्मणांना दक्षिणा कशी मिळाली असती? सिंध जाईना कां, सोरटी सोमनाथ होतात कीं नाहीं? तेथल्या लिंगपूजेवर ब्राह्मणांची चंगळ चाललीच होती! पण तेवढ्यानें तृप्त न होतां बौद्धांच्या व जैनांच्या मठांना परंपरेनें मिळालेल्या इनामांवरहि ब्राह्मणांची दृष्टि होतीच!  आणि एवढ्याचसाठीं त्यांनी ह्या श्रमणांसंबंधानें गैरसमज फैलावण्याचें काम चालू ठेवलें होतें.

२५७. तर मग मुसलमानांचें पारिपत्य ब्राह्मणांना नको होतें काय? असें नव्हे. पण तें जैनांचे व बौद्धांचे मठ मोडण्याइतकें सोपें नव्हतें. तेव्हां तें काम त्यांनी परस्पर कल्कि अवतारावर सोपविलें. कल्कि अवतारांसंबंधानें जी माहिती आमच्या पहाण्यांत आली, त्यांत पहिली विष्णुपुराणांत सांपडते; व ती मुसलमानांनी सिंध देश काबीज केल्यावर लिहिली गेली असें दिसतें. ‘सिंधुतटदाविकोर्वीचन्द्रभागाकाश्मीरविषयांश्च व्रात्यम्लेच्छशूद्रादयो भोक्ष्यन्ति। ... अल्पप्रसादा बृहत्कोपास्सार्वकाल-मनृताधर्मरुचय:  स्त्रीबालगोवधकर्तार: ।...’ अंश ४, अ. २४ । ६९-७१ ।। (सिंधुतट, दाविकोर्वी, चंद्रभागा व काश्मीर प्रांत व्रात्य, म्लेच्छ, शूद्र इत्यादिक उपभोगतील. हे लोक थोडी मेहेरबानी करणारे पण पुष्कळ रागवणारे, सदोदित खोट्या धर्माची रुची बाळगणारे, व स्त्री, बालक आणि गाई यांचा वध करणारे असतील.)  मुसलमान लोक गोवध तर रोजच करीत, व लढाईमध्यें प्रसंगवशात् बायकांना व मुलांनाहि मारीत. तेव्हां त्यांचें राज्य स्थापन झाल्यावर हें विष्णुपुराणांतील भविष्य वर्तविंलें गेलें, यांत शंकाच रहात नाहीं. हें सगळें झाल्यावर पुराणकाराचें गोड स्वप्न म्हटलें म्हणजे, ‘शंबल गांवच्या विष्णुयश नांवाच्या प्रधान ब्राह्मणाच्या घरीं वासुदेवाचा कल्किरूपी अवतार होईल; व तो सर्व म्लेच्छांचा उच्छेद करील, आणि ब्राह्मणधर्माची पुन्हा स्थापना करील’, १
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
१ विष्णु पु० अंश ४, अ० २४।९८ पहा.) हें होय
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
२५८. ह्या वेळीं श्रमणांची स्थिति तर अत्यंत अनुकंपनीय होत चालली होती. अहिंसेचा आणि सत्याचा प्रसार करण्याचें सोडून आपल्या मठांची इस्टेट संभाळण्यासाठीं त्यांनी मंत्रतंत्रांचा पूर्णपणें अंगीकार केला होता. आणि असें असतांहि बंगालच्या पाल राजांचा ह्या बौद्ध श्रमणांना पूर्ण पाठिंबा होता!

२५९. अशा परिस्थितींत महमूद गझनीच्या या देशावर एका मागून एक सतरा स्वार्‍या झाल्या. त्यानें देवळें व मठ मोडण्याचा सारखा क्रम चालविला, आणि हिंदुस्थानांतून अतोनात लूट नेली, हें सर्वप्रसिद्धच आहे. असें असतांहि श्रमण व ब्राह्मण यांच्यापैकीं असा एकहि त्यागी पुरुष निघाला नाहीं कीं, जो हिंदी संस्कृतीचे दोष दूर करून व तिचें योग्य संघटन करून मुसलमानांच्या अत्याचाराला आळा घालील. पुराणांनी उत्पन्न केलेल्या महापंकांत सर्व जनता जणूं काय बुडूनच गेली होती, व ह्या चिखलांतून वर डोकें काढण्याचें कोणाच्याहि अंगी सामर्थ्य राहिलें नव्हतें!
« PreviousChapter ListNext »