Bookstruck

विभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 64

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »
राधाकृष्ण पंथ

२६८. राधेला आणि गोपींना पुढें आणणारा पहिला वैष्णव पुढारी म्हटला म्हणजे निंबार्क होय. तो ११६२ सालीं निवर्तला असें सर भांडारकर म्हणतात. १  परंतु जसा रामानुजाचार्याच्या तसाच याच्याहि मृत्युतिथीसंबंधानें वाद आहे. तरी पण बाराव्या शतकाच्या उत्तरार्धांत त्यानें आपली कामगिरी केली, असें म्हणण्यास हरकत नाहीं. हा जातीचा तेलगू ब्राह्मण होता. त्यानें वासुदेवाच्या पूजेला एक दुसरीच दिशा लावली. विष्णु आणि लक्ष्मी किंवा कृष्ण आणि रुक्मिणी बाजूला ठेवून निंबार्कानें राधाकृष्णाच्या पूजेला विशेष महत्त्व आणलें.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
१ Vaishnavism etc. p. 88 note.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
२६९. त्याच्यानंतर पंधराव्या शतकाच्या अखेरीस व सोळाव्या शतकाच्या आरंभीं वल्लभाचार्य व चैतन्य यांनी ह्या राधाकृष्णाच्या पूजेचा आणखीहि विकास केला. होतां होतां कृष्णापेक्षां राधेचीच पूजा जास्त होऊं लागली. आणि ती साहजिक होती. बौद्ध आणि जैन श्रमणपंथ एवढे त्यागी असतां सुखवस्तु झाल्याबरोबर तंत्रयानांत शिरले, मग कृष्णभक्त सोवळे कसे राहतील? कृष्णाच्या आणि गोपींच्या क्रीडा गुप्तांच्या वेळींच वरिष्ठ वर्गांत प्रिय होत चालल्या होत्या, व सामान्य वर्गांतहि त्यांचा ध्वनि उठूं लागला होता; मग त्या वासुदेवाच्या भक्तीवर उभारलेले हे पंथ स्त्रियांच्या बाबतींत नितिमान् रहाणें शक्यच नव्हतें. त्यांनी उघड रीतीनें राधेला पुढें आणलें, व त्या पायावर आपलें तत्त्वज्ञान स्थापित केलें. त्याचा जो परिणाम व्हावयाचा तो झालाच. तरी त्यांच्यांत आणि श्रमणपंथांत हा फरक होता कीं, श्रमणांच्या तत्त्वज्ञानाचा आणि तांत्रिक आचरणाचा मेळ नसे. पण ह्या राधाकृष्ण वैष्णव संप्रदायांतील लोकांच्या आचरणाचा आणि तत्त्वज्ञानाचा फारसा विरोध नव्हता.
« PreviousChapter ListNext »