Bookstruck

भाग १ ला 4

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »
उपाध्यायाची कर्तव्यें

१६. उपाध्यायानें शिष्याबरोबर नीट रितीनें वागावें. शिष्याविषयीं त्याचीं कर्तव्यें आहेत तीं अशीं:-

उपाध्यायानें शिष्याला पाठ पडवून, धार्मिक प्रश्नांचीं उत्तरें देऊन, उपदेश करून व रीतरिवाज शिकवून मदत करावी, व त्याच्यावर अनुग्रह करावा. उपाध्यायाजवळ जर पात्र असेल व शिष्याजवळ तें नसेल तर त्यानें तें शिष्याला द्यावें, किंवा त्याला दुसरीकडून पात्र मिळवून देण्याची खटपट करावी. शिष्याजवळ चीवर व भिक्षूंना लागणार्‍या इतर वस्तू नसतील, तर उपाध्यायानें ह्याचप्रमाणें वागावें. शिष्य जर आजारी असेल तर, शिष्याचीं कलम ५ पासून १० पर्यंत जीं कर्तव्यें सांगितलीं तींच उपाध्यायाचीं आहेत असें समजून त्याप्रमाणें वागावें. ११, १२ व १३ व्या कलमांत जीं शिष्याचीं कर्तव्यें सांगितलीं तीं तशा तशा प्रसंगी शिष्याविषयीं गुरूनें पाळावीं.

१७. शिष्याचें चीवर धुवावयाचें असल्यास तें कसें धुवावें हें उपाध्यायानें त्याला दाखवावें, किंवा दुसरे कोणीतरी त्याला मदत करतील अशी खटपट करावी. चीवर बनवावयाचें असल्यास, रजन तयार करावयाचें असल्यास आणि चीवर रंगवावयाचें असल्यास, उपाध्यायानें त्यापमाणें वागावें. शिष्य जर आजारी असेल तर तो मरेपर्यंत किंवा बरा होईपर्यंत उपाध्यायाने त्याची शुश्रुषा करावी.

आचार्यांचीं व अन्तेवासिकांचीं कर्तव्यें

१६. त्याकाळीं उपाध्याय प्रवसास गेले असतां, भिक्षुभाव सोडून गृहस्थ झाले असतां किंवा मरण पावले असतां तरुण भिक्षु अव्यवस्थितपणें वागूं लागले. तेव्हां ह्याविषयीं चौकशी करून भिक्षूंना उद्देशून बुद्ध म्हणाला, “भिक्षुहो, आचार्य करण्यास मी तुम्हांस परवानगी देतों. आचार्य अन्तेवासिकावर पुत्रप्रेम ठेवील, व अन्तेवासिक आचार्याला पित्याप्रमाणें मान देईल. ह्याप्रमाणें परस्परांविषयीं आदरानें वागून ह्या धर्मविनयांत त्यांची अभिवृद्धि होईल.” आचार्य ग्रहण करण्याचा विधि चौथ्या कलमांत सांगितल्याप्रमाणें समजावा. आचार्याचीं व अन्तेवासिकाचीं कर्तव्यें अनुक्रमें उपाध्यायाच्या व शिष्याच्या कर्तव्याप्रमाणेंच आहेत असें समजावें.

१९. पुढें निरनिराळ्या प्रसंगीं बुद्धानें असे नियम केले कीं, उपाध्याय व आचार्य निदान दहा वर्षें तरी संघांत भिक्षु होऊन राहिले असले पाहिजेत, व शिष्यांना व अन्तेवासिकांना संभाळ्याचें त्यांस सामर्थ असावयास पाहिजे.
« PreviousChapter ListNext »