Bookstruck

भाग १ ला 26

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »
भगवान् म्हणाला, “जर महाप्रजापती गौतमी आठ जबाबदारीच्या गोष्टी (अट्ठ गरुम्मा) पत्करण्यास कबूल असेल तर स्त्रियांना प्रव्रज्या घेण्यास मी परवानगी देतों. (१) भिक्षुणी संघांत कितीहि वर्षे राहिलेली असो; तिनें लहान मोठ्या सर्व भिक्षूंना नमस्कार केला पाहिजे. (२) ज्या गांवी भिक्षु नसतील त्या गांवी भिक्षुणीनें रहातां कामा नये. (३) दर पंधरवड्यास उपोसथ कोणत्या दिवशीं व उपदेश ऐकण्यास कधीं यावें. ह्या दोन गोष्टी भिक्षुणीनें भिक्षुसंघाला विचाराव्या. (४) वर्षाकाळानंतर भिक्षुणीनें दोन्ही संघांची (भिक्षुसंघाची व भिक्षुणीसंघाची) प्रवारणा केली पाहिजे. (५०) जिच्याकडून संघादिशेष आपत्ति घडली असेल त्या भिक्षुणीनें दोन्ही संघांकडून पंधरा दिवसांचे मानत्त घेतलें पाहिजे. (६) दोन वर्षे जी शिकली असेल अशा श्रामणेरीला दोन्ही संघांकडून उपसंपदा मिळाली पाहिजे. (७) कोणत्याहि कारणास्तव भिक्षुणीनें भिक्षूला शिवीगाळ देतां कामा नये. (८) आजपासून भिक्षुणीनें भिक्षूला उपदेश करतां कामा नये; भिक्षूनें भिक्षुणीला करावा.”

आनंदानें त्या आठ गोष्टी महाप्रजापती गौतमीला कळविल्या, व तिला त्या पसंत पडल्या. तीच तिची उपसंपदा झालीं असें भगवंतानें सांगितलें. तेव्हांपासून भिक्षुणीसंघाची स्थापना झाली. भिक्षुणीसंघांत प्रवेश करण्याचे नियम बहुतेक भिक्षुसंघाच्या नियमांप्रमाणेंच आहेत. उपसंपदेच्या वेळीं भिक्षूला, ‘तूं पुरुष आहेस ना?’ असें विचारण्यांत येतें, तेथे भिक्षुणींला, ‘तूं स्त्री आहेस ना?’ असें विचारण्यांत येतें; व जेथें भिक्षूला ‘तुझा उपाध्याय कोण?’ असें विचारण्यांत येतें तेथें भिक्षुणीला ‘तुझी प्रवार्तिनी कोण?’ असें विचारण्यांत येतें. एखाद्या स्त्रीला मार्गांत अडथळे असल्याकारणानें संघापाशीं येऊन उपसंपदा घेतां येत नसली, तर तिला एखाद्या भिक्षुणीमार्फत उपसंपदा देण्यांचा संघाला अधिकार आहे. भिक्षुणीनें अरण्यांत राहातां कामा नये, वगैरे भिक्षूंना लागू न पडणारे कांही नियम पाळले पाहिजेत.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
समाप्त
« PreviousChapter ListNext »