Bookstruck

भाग २ रा 5

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »
४.बुद्ध भगवान् वैशाली येथें महावनांत कूटागार शाळेंत रहात होता. त्या काळीं कांहीं नामांकित भिक्षू वल्गुमुदा नदीच्या कांठीं वर्षाकाळासाठीं रहात असत. त्या वर्षी वज्जिराष्ट्रांत दुष्काळ पडला होता. त्यामुळें त्या भिक्षूंला आपला निर्वाह कसा करावा ह्याची काळजी पडली. कांहीं म्हणाले, “आपण गृहस्थांच्या कामावर देखरेख करून आपला निर्वाह करूं.” दुसरे म्हणाले, “आपण गृहस्थांचे दूतकर्म करूं; व आपला निर्वाह करूं.” पण तिसरे म्हणाले, “ह्यांत कांही फायदा नाहीं. आपण गृहस्थांपाशीं, अमुक तमुक भिक्षूंला प्रथम ध्यान प्राप्त झालें आहे. व्दितीय ध्यान, तृतीय ध्यान, चतुर्थ ध्यान प्राप्त झालें आहे, अमका स्त्रोतआपन्न आहे,  सकृदागामी, अनागामी, अर्हत्, त्रैविद्य, षडभिज्ञ आहे अशी परस्परांची स्तुति करूं. त्यायोगें ते आम्हांस भिक्षा देतील, व आम्हीं सुखानें आणि सामग्रीनें वर्षाकाळ घालवूं.” ही गोष्ट सर्वांनाच पसंत पडली. त्यांनीं गृहस्थांपाशीं परस्परांची स्तुति चालविली; व गृहस्थांचा त्यांच्यावर विश्वास बसून स्वत: हाल कष्ट सोसूनहि ते त्यांना यथास्थित भिक्षा देऊं लागले. अन्नपानाची ददात नसल्यामुळें ते भिक्षू चांगले लठ्ठ झाले.

देशांत सर्वत्र दु्ष्काळ असल्यामुळें बहुधा भिक्षु कृश आणि दुर्बळ दिसत असत. पण वल्गुमुदा नदीच्या तीरावर रहाणारे भिक्षु जेव्हां भगवंताच्या दर्शनाला आले तेव्हां ते त्याला चांगले लठ्ठ दिसले. वर्षाकाळ कसा काय घालविला ह्याची भगवंतानें त्यांच्याशीं चौकशी केली. आपण परस्परांची गृहस्थांपाशीं स्तुति करून यथास्थित भिक्षा मिळण्याची सोय कशी केली, हें वर्तमान त्यांनीं भगवंताला सांगितलें. तेव्हां त्यांची निंदा करून सर्व भिक्षूंला उद्देशून भगवान् म्हणाला, “भिक्षुहो, हे पांच चोर इहलोकीं आढळतात:-(१) एखाद्या महाचोराला असें वाटतें कीं, शंभर, हजार लोकांना बरोबर घेऊन ठार मारीत आणि लुटालूट करीत, गांवांतून, शहरांतून आणि राजधानींतून मी कधीं फिरत राहीन? कांही काळानें आपल्या विचारांप्रमाणें शंभर किंवा हजार लोक बरोबर घेऊन गांवांतून, शहरांतून आणि राजधानींतून तो घातपात आणि लुटालूट करीत फिरत असतो. त्याचप्रमाणें एखाद्या पाप-भिक्षूला असें वाटतें कीं मी शंभर किंवा हजार भिक्षूंला बरोबर घेऊन लोकांकडून सत्कार आणि पूजा घेत घेत गांवांतून, शहरांतून आणि राजधानींतून कधीं प्रवास करीत राहीन? कांहीं काळानें तो शंभर किंवा हजार भिक्षूंला घेऊन अशा रीतीनें गांवांतून, शहरांतून आणि राजधानींतून प्रवास करीत जातो. हा पहिला महाचोर समजला पाहिजे. (२) दुसरा एक पापभिक्षु तथागतानें उपदेशिलेला धर्म शिकतो, व तो आपणच स्वत: जाणला असें सांगतो. हा दुसरा महाचोर. (३) तिसरा एकदा पापभिक्षु श्रद्धावान् सब्रह्मचारी परिशुद्ध ब्रह्मचर्य पाळीत असतां त्यांच्यावर खोटा आळ आणून त्याला ब्रह्मचर्यापासून भ्रष्ट करूं पहातो. हा तिसरा महाचोर. (४) चवथा एकादा पापभिक्षु, आराम, आरामाची जागा, विहार, विहाराची जागा, मंचक, आसन, उशी, लोखंडाची कढई व इतर भांडीं, कुर्‍हाड, कुदळ वगैरे आउतें, बांबू, गवत, माती, लांकडी किंवा मातीचीं भांडी इत्यादी सांघिक वस्तू गृहस्थांना देऊन त्यांना लोभवितो. हा चवथा महाचोर. (५) पण जो आपल्या अंगीं नसलेला लोकोत्तर धर्म (ध्यानसमाधि वगैरे) प्रकाशित करतो तो सर्व जगांत अत्यंत मोठा चोर समजला पाहिजे.”

ह्याप्रमाणें भगवंतानें अनेक रितीनें वल्गुमुदा नदीच्या तीरावरून आलेल्या भिक्षूंची निंदा करून भिक्षूंला नियम घालून दिला तो असा:-“जो भिक्षु न जाणतां आर्यज्ञानदर्शनाला उपयोगी पडणारा लोकोत्तर धर्म आपणाला प्राप्त झाल्याचें भासवील व पुढें चोकशी केली असतां किंवा केली नसतां दोषी होऊन शुद्ध होण्याच्या इच्छेनें म्हणेल कीं, मी न जाणतांच न पाहतांच खोटें बोललों-तोहि पाराजिक होतो, सहवासाला अयोग्य होतो.”

त्या काळीं कांही भिक्षूंला आपणाला अर्हत्त्व प्राप्त झाल्याचा भ्रम झाला होता. ती गोष्ट त्यांनीं प्रकाशित केली. परंतु पुढें तो भ्रम होता असे त्यांस आढळून आलें. हें वर्तमान भगवंताला समजलें. तेव्हां त्यानें वरील नियमांत फेरफार केला तो असा:-

जो भिक्षु न जाणतां आर्यज्ञानदर्शनाला उपयोगी पडणारा लोकोत्तर धर्म आपणाला प्राप्त झाल्याचें भासवील, व पुढें चौकशी केली असतां किंवा केली नसतां दोषी होऊन शुद्ध होण्याच्या इच्छेनें म्हणेल कीं, मी न जाणतांच न पहातांच खोटें बोललों-जर भ्रम झाला नसेल तर-तोहि पाराजिक होतो, सहवासाला अयोग्य होतो।।४।।
« PreviousChapter ListNext »