Bookstruck

भाग २ रा 34

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »
९०. बुद्ध भगवान् वैशाली येथें महावनांत कूटागार शाळेंत रहात होता. त्या काळीं संघाला पुष्कळ खाण्याचे पदार्थ मिळाले होते. आनंदानें शिल्लक राहिलेल्या पदार्थांचें काय करावें असें भगवंताला विचारलें. तेव्हां भगवंतानें ते पदार्थ गरीब लोकांस वांटून देण्यास सांगितलें. त्यांत पुष्कळ परिव्राजिकाहि होत्या. आनंदानें प्रत्येकाल एक एक अपूप दिला. पण एका परिव्राजिकेच्या पात्रांत चुकून दोन अपूप पडले. तेव्हां इतर परिव्राजिका तिला, हा तुझा जार आहे, असें म्हणून हिणवूं लागल्या.

त्याच वेळीं दुसरी अशी एक गोष्ट घडली कीं, एक आजीवक आरामांत आला असतां एका भिक्षूनें त्याला पुष्कळ तूप घालून चांगलें अन्न दिलें. तो तें घेऊन गेला. वाटेंत दुसर्‍या आजीवकानें, हें कोठून आणलें, असा प्रश्न केला असतां तो म्हणाला, “मुंडगृहपति श्रमण गोतम ह्याच्या समाराधनेंत हें अन्न मला मिळालें.” कांहीं उपासकांनीं हें त्याचें भाषण ऐकलें; व आरामांत येऊन भगवंताला नमस्कार करून ते म्हणाले, “हे तीर्थ्य (तित्थिय) बुद्ध, धर्म आणि संघ ह्यांची निंदाच करूं पहात असतात; तेव्हां अशा लोकांना आर्यांनीं (भिक्षूंनीं) आपल्या हातांनीं जेवण देऊं नये.” भगवंतानें धर्मोपदेश करून त्या उपासकांना रवाना केलें; आणि ह्या प्रकरणीं भिक्षूंना नियम घालून दिला तो असा:-

जो भिक्षु अचेलक (नन्ग) परिव्राजकाला किंवा परिव्राजिकेला स्वहस्तानें खाण्याचे किंवा जेवण्याचे पदार्थ देईल, त्याला पाचित्तिय होतें ।।४१।।

९१. बुद्ध भगवान् श्रावस्ती येथें जे. अ. आरामांत रहात होता. त्या काळीं उपनंद शाक्यपुत्र आपल्या भाऊ शिष्याला म्हणाला, “चल आपण, गांवांत भिक्षाटनाला जाऊं;” व गांवांत पोहोंचल्यावर त्याला कांहीं एक न देववितां म्हणाला, “तूं येथून निघून जा. तुझ्याबरोबर बोलणें किंवा बसणें उठणें मला आवडत नाहीं. मला एकट्यालाच बरें वाटतें.” त्याच्या भावाला उशीर झाल्यामुळें भिक्षा मिळाली नाहीं, व त्यानें परत येऊन ही गोष्ट भिक्षूंना सांगितली...ह्या बाबतींत भगवंतानें भिक्षूंना नियम घालून दिला तो असा:-

जो भिक्षु भिक्षुला म्हणेल कीं, चल आपण गांवांत किंवा शहरांत भिक्षेला जाऊं; आणि तेथें त्याला कांहीं द्यावयास लावून किंवा न द्यावयास लावून, जा, तुझ्याबरोबर बोलणें किंवा बसणें उठणें मला आवडत नाहीं, मी एकटाच असलों तर इतरांशीं बोलणें व बसणें उठणें मला आवडतें असें म्हणून त्याला परत पाठवील तर-ह्याच कारणास्तव-त्याला पाचित्तिय होतें ।।४२।।

९२. बुद्ध भगवान् श्रावस्ती येथें जे. अ. आरामांत रहात होता. त्या काळीं उपनंद शाक्यपुत्र आपल्या मित्राच्या घरीं जाऊन त्याच्या बायकोबरोबर शयनगृहांत बसला. इतक्यांत तो मित्र तेथें आला; व त्यानें उपनंदाला भिक्षा द्यावयास लावून जाण्यास सांगितलें. पण त्याची बायको त्याला आणखी कांहीं वेळ बसण्यास आग्रह करूं लागली. तेव्हां उपनंद तेथेंच बसला. हें कृत्य त्या गृहस्थाला आवडलें नाहीं. तो उपनंदावर टीका करूं लागला...आणि भगवंतानें ह्या बाबतीत नियम केला तो असा:-

जो भिक्षु स्त्रीपुरुष एकत्र राहाणार्‍या घरांत प्रवेश करून बसेल, त्याला पाचित्तिय होतें ।।४३।।

९३. बुद्ध भगवान् श्रावस्ती येथें जे. अ. आरामांत रहात होता. त्या काळीं उपनंद शाक्यपुत्र आपल्या मित्राच्या घरीं जाऊन त्याच्या बायकोबरोबर एकान्तांत बसला. तें पाहून तो मित्र त्याच्यावर टीका करूं लागला, आणि ह्या बाबतींत भगवंतानें नियम केला तो असा:-

जो भिक्षु स्त्रीबरोबर एकान्तांत बसेल त्याला पाचित्तिय होतें ।।४४।।

९४. दुसर्‍या एका प्रसंगीं उपनंद असाच एकटा एकट्या स्त्रीबरोबर बसला असतां भगवंतानें नियम केला तो असा:-

जो भिक्षु एकटा एकट्या स्त्रीबरोबर एकान्तांत बसेल त्याला पाचित्तिय होतें ।।४५।।
« PreviousChapter ListNext »